“बहती हवा सा था वो… कहाँ गया उसे ढूंढो,” ; दादांच्या अपघातानंतर “हा” कुठे गायब झाला? – आमदार अमोल मिटकरींचा सवाल

0
1

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Amol Mitkari यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दादांच्या विमान अपघातानंतर नरेश अरोरा नेमके कुठे आहेत, असा सवाल करत मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली असून त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिटकरी यांनी सोशल मीडियावर नरेश अरोरा यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “दादांच्या विमान अपघात दुर्घटनेनंतर सध्या हे महाशय कुठे आहेत? यांच्याकडे महाराष्ट्राच दुर्लक्ष होत आहे का? कारण त्यांचे विचार ऐकून आता त्यांचा शोध महाराष्ट्राने घ्यायलाच पाहिजे… #शोधमोहिम.” या पोस्टनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चांना वेग आला आहे.

माध्यमांशी बोलताना मिटकरी म्हणाले की, पक्षाच्या अनेक गोष्टींचे नियोजन नरेश अरोरा करत होते. निवडणूक निकालानंतर त्यांनी दादांना गुलाबी जॅकेट दिले होते तसेच पुष्पगुच्छ देत त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. पक्षाच्या रणनीतीपासून अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग होता. मात्र दादांच्या निधनानंतर ते फक्त एक-दोन दिवस दिसले आणि त्यानंतर कुठे गेले हे माहित नसल्याचे मिटकरी यांनी सांगितले.

मिटकरी पुढे म्हणाले की, नरेश अरोरा सध्या महाराष्ट्रात आहेत की देशाबाहेर आहेत याबाबत कोणतीही माहिती नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतरही ते कुठे दिसले नाहीत. अशा दु:खाच्या प्रसंगी त्यांनी पक्षासोबत राहायला हवे होते, काही पोस्ट किंवा प्रतिक्रिया द्यायला हवी होती, मात्र ते पूर्णपणे गायब असल्याचा प्रश्न आम्हाला पडला आहे.

यावेळी मिटकरी यांनी विधानसभेतील चर्चेचाही मुद्दा उपस्थित केला. अजित पवार यांच्या अपघाताबाबत सभागृहात अद्याप कोणतीही सविस्तर चर्चा झालेली नाही. या आठवड्यात फक्त दोन दिवसांचे कामकाज असून पुढील आठवड्यात सुट्ट्या आहेत, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वीही या विषयावर चर्चा होणार नसल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र Rohit Pawar त्यांच्या पद्धतीने या विषयावर प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणूक निकालानंतरच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत मिटकरी म्हणाले की, त्या वेळी अरोरा यांनी दादांच्या खांद्यावर हात ठेवत पुष्पगुच्छ दिला होता. तेव्हा मी त्यांना ‘सोल्जर नाही, तर सॅलरी सोल्जर’ असे म्हटले होते. आता ते नेमके कुठे आहेत, याचे उत्तर मिळायला हवे. व्हीएसआर अहवालाबाबतही त्यांनी काही भाष्य केलेले नाही. त्या अहवालावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, असेही मिटकरी म्हणाले.

“बहती हवा सा था वो… कहाँ गया उसे ढूंढो,” असे म्हणत नरेश अरोरा कुठे आहेत, असा सवालही मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here