वडिलांच्या स्वप्नाला यशाची सलामी ; आटपाडी तालुक्यातील मिटकीच्या प्रवीण कोळपे यांची यूपीएससीत दमदार कामगिरी

0
8

मिटकी (ता. आटपाडी) : ग्रामीण भागातील जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांचे उत्तम उदाहरण ठरलेल्या प्रवीण उत्तमराव कोळपे यांनी सन २०२५ मधील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) देशपातळीवर ५८४ वा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे मिटकी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रवीण कोळपे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिटकी येथे झाले. साध्या कुटुंबातून शिक्षणाची सुरुवात करत त्यांनी लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य आणि मेहनतीचा आदर्श ठेवला. त्यांचे वडील कै. उत्तमराव हरिबा कोळपे यांनी मुलाच्या शिक्षणासाठी नेहमीच पाठबळ दिले. वडिलांच्या निधनानंतर आई वंदना उत्तमराव कोळपे यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत प्रवीण यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. भाऊ प्रमोद उत्तमराव कोळपे यांचाही त्यांना मोलाचा पाठिंबा लाभला.

माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ विद्यालयात प्रवेश घेतला. शालेय जीवनातच त्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वाटचाल करण्याचा निर्धार केला होता. पुढे सांगली येथील विलिंग्डन कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करत त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पाया रचला.

यूपीएससीसारख्या देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी त्यांनी कराड येथे तब्बल सहा वर्षे अत्यंत खडतर अभ्यास केला. आर्थिक व मानसिक आव्हानांना सामोरे जात त्यांनी सातत्याने तयारी सुरू ठेवली. त्यानंतर दिल्ली येथे जाऊन अधिक सखोल मार्गदर्शन घेत अभ्यासाची धार अधिक तीव्र केली. अनेक अपयश आणि अडथळ्यांवर मात करत अखेर २०२५ च्या परीक्षेत त्यांनी ५८४ वा क्रमांक मिळवून स्वप्न साकार केले.

प्रवीण कोळपे यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेकडे वाटचाल करत असल्याचा अभिमान गावकऱ्यांना वाटत आहे. “परिस्थिती काहीही असो, ध्येय निश्चित असेल आणि त्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळते,” असा संदेश प्रवीण यांनी दिला आहे.

मिटकी ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि नातेवाईकांनी त्यांचा सत्कार करण्याची तयारी सुरू केली असून गावात आनंदोत्सवाचे वातावरण आहे. प्रवीण कोळपे यांच्या या यशामुळे मिटकी गावाचे नाव राज्यासह देशपातळीवर उज्ज्वल झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here