
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या. हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त करत व्हीएसआर (VSR) कंपनी आणि कॅप्टन सुमित कपूर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रोहित पवार म्हणाले की, या दुर्दैवी घटनेनंतर तपासाला काहीशी गती मिळाली असली तरी तपास अपेक्षित वेगाने होत नाही. गेल्या काही दिवसांत व्हीएसआर कंपनीची भूमिका, कंपनीच्या मालकाचे राजकीय लागेबांधे, विमानाची स्थिती, पायलटची मनःस्थिती, ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि तपासावर होणारा संभाव्य मानवी हस्तक्षेप या बाबी संशय निर्माण करणाऱ्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा यासाठी देशाबाहेरील दोन स्वतंत्र तपास यंत्रणांची मदत घेण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, राज्य व देशाच्या पातळीवरील विरोधी पक्षनेते, कुटुंबातील प्रतिनिधी, पक्षातील सदस्य आणि तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष समिती नेमण्याचीही मागणी रोहित पवार यांनी केली.
याच पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास नेतृत्वात बदल करण्याची अजित पवार यांची भूमिका होती, असा दावा त्यांनी केला. प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेतृत्व असावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती आणि त्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव चर्चेत होता, असे त्यांनी सांगितले.
रोहित पवार यांच्या मते, या संदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या. जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकींचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास अजित पवार यांची उपस्थिती दिसून येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विलिनीकरणाच्या चर्चेवरून त्यांनी नाव न घेता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. काही नेते सातत्याने विलिनीकरणावर बोलत असताना आम्ही अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासावर लक्ष केंद्रीत करत आहोत, असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या दाव्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, विमान अपघाताच्या तपासाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.


