खरसुंडी जिल्हा परिषद गटाचा निकाल सर्वात आधी, निंबवडे शेवटी

0
8

माणदेश एक्सप्रेस न्यूज ;  आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आजची मतमोजणी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आटपाडी येथील तहसीलदार कार्यालयात आज चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. सकाळपासूनच उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांची तहसीलदार कार्यालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

मतमोजणीच्या क्रमवारीनुसार सर्वप्रथम खरसुंडी जिल्हा परिषद गटाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर अनुक्रमे करगणी जिल्हा परिषद, दिघंची जिल्हा परिषद आणि शेवटी निंबवडे जिल्हा परिषद गटाचा निकाल घोषित केला जाणार आहे. त्यामुळे प्रारंभीच खरसुंडी गटाचा निकाल हा संपूर्ण निवडणूक चित्र स्पष्ट करणारा ठरेल.

पंचायत समिती गणांच्या मतमोजणीसाठीही ठसर्वात प्रथम खरसुंडी, नेलकरंजी, करगणी, माडगुळे, दिघंची, विठलापूर, निंबवडे आणि घरनिकी अशा क्रमाने निकाल जाहीर होणार आहेत. प्रत्येक गणात मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याने चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या असून, मतमोजणीदरम्यान चढ-उताराचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
चारही जिल्हा परिषद गट व आठही पंचायत समिती गणांमध्ये मुख्य पक्षांमध्ये दुरंगी लढती रंगल्या असल्या, तरी काही ठिकाणी तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांनीही निवडणूक अधिक रंगतदार केली आहे.

 

विशेषतः खरसुंडी जिल्हा परिषद गट व विठलापूर पंचायत समिती गणात रासप व वंचित आघाडीचे उमेदवार रिंगणात असल्याने निकालात चुरस वाढली आहे. खरसुंडी जिल्हा परिषद गटातून रासप तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून, पोलीस बंदोबस्तातच मतमोजणी सुरू आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे समर्थक जल्लोष करण्याच्या तयारीत असून, पराभूत उमेदवारांचेही लक्ष शेवटच्या फेरीपर्यंत लागून राहणार आहे. आज जाहीर होणारे हे निकाल आटपाडी तालुक्यातील आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार आहेत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here