आटपाडीचा कौल आज! राजकीय प्रतिष्ठा पणाला : कोणाचा झेंडा फडकणार? : तालुक्याचे लक्ष निकालांकडे

0
27

माणदेश एक्सप्रेस न्यूज ;आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी आज तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकालांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सकाळपासूनच प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीस सुरुवात होणार असून, प्रत्येक गटात चुरशीच्या आणि बहुरंगी लढती होत असल्याने निकाल शेवटच्या फेरीनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

खरसुंडी जिल्हा परिषद गटात बहुपक्षीय लढत
खरसुंडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे जयदीप भोसले व भाजपचे चंद्रकांत भोसले यांच्यात मुख्य लढत होत असली तरी, या गटात रासपकडून सत्यजित गलंडे, वंचित आघाडीकडून खरसुंडी ग्रामपंचायतीचे सदस्य शफिक तांबोळी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून शेखर निचळ निवडणूक रिंगणात असल्याने लढत अधिकच रंगतदार बनली आहे.
खरसुंडी पंचायत समिती गणासाठी शिवसेनेच्या मीनाक्षी पुजारी व भाजपच्या लता पुजारी यांच्यात थेट सामना होत असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मयुरी भांगे यांनीही लढतीत रंग भरला आहे.

करगणी गटात युती विरुद्ध भाजप अशी थेट लढत
करगणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना युतीकडून विनायकशेठ मासाळ तर भाजपकडून दादासाहेब हुबाले यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गायकवाड व मनसेकडून राजेश जाधव मैदानात उतरल्याने मतविभाजनाची शक्यता नाकारता येत नाही.
करगणी पंचायत समिती गणात शिवसेनेचे दत्तात्रय पाटील (करगणी) व भाजपचे संभाजी पाटील (शेटफळे) यांच्यात थेट सामना होत आहे. माडगुळे पंचायत समिती गणासाठी भाजपचे बोंबेवाडीचे माजी सरपंच दादासाहेब मोटे व शिवसेनेचे खानजोडवाडीचे माजी सरपंच रामदास सूर्यवंशी आमनेसामने असून, रासपचे विकास सरगर यांचीही या लढतीत उपस्थिती आहे.

दिघंची गटात प्रतिष्ठेची लढत
दिघंची जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील व भाजपचे कलाप्पा कुटे यांच्यात थेट सामना होणार आहे. मात्र संदेश खटके व निलेश धोत्रे हेही निवडणूक रिंगणात असल्याने निकालावर त्यांचा प्रभाव पडू शकतो.
दिघंची पंचायत समिती गणासाठी शिवसेनेच्या कल्पना देवेंद्र पुसावळे व भाजपच्या वंदना संदीप शिंदे यांच्यात लढत होत आहे. विठलापूर पंचायत समिती गणात शिवसेनेचे आवळाईचे माजी उपसरपंच दिलीप हेगडे व भाजपचे राजेवाडीचे वैभव हेगडे आमनेसामने असून, वंचित आघाडीकडून पुजारीवाडीचे सुयश कदम निवडणूक लढवत आहेत.

निंबवडे गटात सर्वाधिक रंगत
निंबवडे जिल्हा परिषद गटात सर्वाधिक लक्षवेधी व प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर तर शिवसेनेकडून आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे यांच्यात थेट सामना होत आहे.
निंबवडे पंचायत समिती गणासाठी शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य सचिन मोटे व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष जयवंत सरगर यांच्यात लढत आहे. घरनिकी पंचायत समिती गणात शिवसेनेच्या अहिल्या पुकळे (घरनिकी) व भाजपच्या वैशाली कातुरे (झरे) यांच्यात सामना होत आहे.

निकालांकडे सर्वांचे लक्ष
तालुक्यातील प्रत्येक गटात चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या लढती होत असल्याने मतमोजणीदरम्यान चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष तालुक्यावर आपले वर्चस्व सिद्ध करतो, हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार असून, राजकीय वातावरण तापले आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here