पत्नीशी वाद पतीने ४ महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये बुडवले; स्वतःचाही गळफास घेऊन जीवन संपवले

0
285

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | गेवराई :
कौटुंबिक वादातून गेवराई तालुक्यातील रामनगर येथे शुक्रवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. ३० वर्षीय शेतकऱ्याने आपल्या चार महिन्यांच्या निरागस बाळाला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून ठार मारले आणि त्यानंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृताचे नाव अमोल हौसेराव सोनवणे (वय ३०, रा. रामनगर, ता. गेवराई) असे आहे. तर त्याची पत्नी पायल अमोल सोनवणे सध्या जिवंत असून तिला मानसिक धक्का बसला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अमोल सोनवणे आणि पत्नी पायल यांच्यात २९ सप्टेंबर रोजी कौटुंबिक कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात दोघांनीही विष प्राशन केले. तत्काळ ग्रामस्थांनी दोघांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने २ ऑक्टोबरला, दसऱ्याच्या दिवशी, त्यांना घरी सोडण्यात आले.


शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजता झोपेतून उठून अमोलने आपल्या चार महिन्यांच्या मुलाला घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये टाकले. काही वेळातच बाळाचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर अमोलने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

सकाळी ही घटना उघडकीस आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. लगेच तलवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


अमोल सोनवणे याच्या मृतदेहाचे तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी तीन वाजता रामनगर येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


अमोल सोनवणे हा शेतकरी असून त्याच्याकडे पाच एकर शेती आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी, पत्नी असा परिवार आहे. घरचा कर्ता पुरुष गेला आणि निरागस बाळाचे अकाली निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


या घटनेमुळे रामनगर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत असून, छोट्या कारणांमुळे निर्माण होणारे कौटुंबिक वाद किती भयानक वळण घेतात, याचे आणखी एक भीषण उदाहरण समोर आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here