
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | दहिवडी :
गावातील अंधश्रद्धेचा आणखी एक बळी ठरला आहे. माण तालुक्यातील मार्डी गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आई व बहिणीला त्रास देणाऱ्या आजीचा काटा काढण्यासाठी नातवाने सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथे जाऊन मांत्रिकाचा सल्ला घेतला. मांत्रिकाने दिलेल्या सूचनांनुसार खून घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी नातू पुन्हा त्याच्याकडे गेला आणि ‘पोलिसांना समजेल का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर मांत्रिकाने देवाला कौल लावून ‘नाही समजणार’ असे उत्तर दिले. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे अखेर खून उघडकीस आला आणि अल्पवयीन नातवासह मांत्रिकालाही अटक करण्यात आली आहे.
मार्डी गावातील वृद्ध महिला आपल्या सुनेला व नातवंडांना त्रास देत होती. वारंवार भांडणे करून आई व बहिणीला उपाशी ठेवण्याचे प्रकार केल्याने अल्पवयीन नातू संतप्त झाला होता. अखेर त्याने आई-बहिणीच्या सुटकेसाठी आजीचा खून करण्याचा निर्णय घेतला. या कटाची पूर्तता करण्यासाठी तो सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील देवर्षि पुजारी आनंदा दत्तात्रय तांदळे (रा. येडेनिपाणी) याच्याकडे गेला. त्याने मांत्रिकाला थेट विचारले की, ‘आजीचा खून करायचा आहे, काय करावे लागेल?’
पुजारी तांदळे याने आरोपी नातवाला सांगितले की, ‘खून करताना एकट्याने जायचे. कोणालाही सोबत घेऊ नये, नाहीतर पोलिसांना लगेच समजते.’ त्यानुसार नातवाने नियोजन केले. मध्यरात्री घरातील म्हैस सोडून दिली. म्हैस शोधण्यासाठी आजी घराबाहेर पडली तेव्हा आरोपीने तिच्या डोक्यात क्रिकेट बॅटने जबर मार केला. ती खाली पडल्यावर दगड घालून तिचा जागीच खून केला.
ही घटना पार पडल्यावर दुसऱ्याच दिवशी आरोपी नातू पुन्हा येडेनिपाणी येथे गेला आणि पुजारीला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांना संशय येईल का? अशी विचारणा केली. त्यावेळी पुजाऱ्याने देवाला कौल लावून ‘उजवा कौल आला आहे, पोलिसांना कधीच समजणार नाही, तू निर्धास्त राहा’ असे सांगितले. परंतु पोलिसांच्या दक्ष तपासापुढे अंधश्रद्धा फोल ठरली.
या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तांत्रिक बाबींचा वापर करून आरोपीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. मिळालेल्या माहितीच्या आधारे केवळ दोन दिवसांत अल्पवयीन नातवाला अटक करण्यात यश आले. चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिली. त्याच्या कबुलीजबाबावरून मांत्रिक पुजारी आनंदा तांदळे यालाही बेड्या ठोकण्यात आल्या.
या संपूर्ण कारवाईत पोलिस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या पथकाने केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.


