आटपाडी : शाळेतील मुलीचा आत्महत्येचा धक्कादायक प्रकार; लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलमुळे जीवन संपवले!

0
5313

करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) | ८  जुलै २०२५

करगणी गावात एक धक्कादायक आणि काळजाला चिरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. दहावीत शिकणाऱ्या  अल्पवयीन मुलीने  (वय १६)  चार तरुणांच्या सातत्याने होणाऱ्या त्रासाला आणि लैंगिक अत्याचाराच्या भीतीला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ७ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे. पीडितेने आत्महत्येपूर्वी तिच्या वडिलांना त्रासदायक घटनांची माहिती दिल्याचा गंभीर खुलासा तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या वर्दीमध्ये केला आहे.

सदरची मुलगी ही करगणी येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिकत होती. तिच्या वडिलांनी सांगितले की, ६ जुलै रोजी रात्री जेवणाच्या वेळेस तिने  त्यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, गावातील राजु विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहीत खरात, आणि अनिल काळे हे चौघे शाळा येता-जाता तिचा पाठलाग करत होते, तिच्यावर अश्लील मागण्या करत होते आणि शरीरसुखासाठी दबाव टाकत होते. या घृणास्पद मागण्यांना तिने नकार दिल्यानंतर, त्या चार आरोपींपैकी एकाने तिला आयसीआयसी बँकेच्या वरच्या मजल्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर त्याचा व्हिडीओ क्लिप काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती.

या प्रचंड मानसिक तणावाखाली ती  बिथरली होती. “बाबा, मला खूप त्रास होतोय” असे तिने भावनिक स्वरात सांगितले होते. वडिलांनी तिला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जायचं सांगितलं, पण त्याआधीच, ७ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तिने  राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरी लावून गळफास घेतला.

तिच्या धाकट्या बहिणीने ही घटना वडिलांना सांगितल्यानंतर घरात एकच हंबरडा फुटला. या घटनेनंतर मुलीचे वडील  यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांनी तिच्या  आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या चौघांविरुद्ध (१) राजु विठ्ठल गेंड, (२) रामदास गायकवाड, (३) रोहीत सर्जेराव खरात, (४) अनिल नाना काळे यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाने संपूर्ण करगणी परिसरात चीड व संतापाची लाट उसळली असून, सदर आरोपी विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून  स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here