
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची हकालपट्टी झाल्यानंतर, नव्याने रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मावळते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक आणि मनाला भिडणारं पत्र लिहून त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला आहे. त्यांनी या पत्रात आपल्या प्रवासाच्या आठवणी शेअर केल्या असून, आपल्याकडून अनवधानाने झालेल्या चुका असल्यास क्षमा मागितली आहे.
बावनकुळे यांनी लिहिलंय, “कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे,” या कविवर्य ना. धो. महानोर यांच्या ओळींचा संदर्भ देत आपल्या मन:स्थितीचं वर्णन केलं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी आपलं जीवन झोकून दिलं आणि भिंती रंगवण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास थेट प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचला, हे त्यांनी नमूद केलं.
१२ ऑगस्ट २०२२ रोजी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना जो आनंद आणि जबाबदारीची जाणीव त्यांनी अनुभवली, त्याचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं, “ही जबाबदारी माझ्यासाठी शिवधनुष्य होती आणि ते पेलण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला.”
आपल्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करत पक्ष संघटनेचा विस्तार केला. विशेष म्हणजे, भाजपला राज्यात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला पक्ष बनवण्याचं श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिलं. बावनकुळे म्हणाले, “बूथवरचा कार्यकर्ता ते मोठा नेता, सर्वांमध्ये समन्वय ठेवून आम्ही संघटनपर्व राबवलं.”
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या दोन्ही काळात त्यांनी भाजपचं नेतृत्व केलं. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने क्षणिक निराशा झाली, मात्र त्यातून शिकत त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिलं, असं त्यांनी पत्रात नमूद केलं.
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही पुन्हा सरकार स्थापनेपर्यंत मजल मारली. याचे पूर्ण श्रेय कार्यकर्त्यांचे आहे.”
पत्राच्या शेवटी त्यांनी म्हटलं, “अध्यक्ष म्हणून काम करताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कुणाला रागावलो असेन, तर मी मनापासून माफी मागतो.” त्यांनी आपलं ब्रीद “राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः” असल्याचं ठामपणे अधोरेखित केलं.
सध्या राज्याचे महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे पत्र कार्यकर्त्यांच्या अंत:करणाला स्पर्शून जाणारं असून, भाजपच्या कार्यसंस्कृतीत एक मानवी आणि भावनिक अधोरेख तयार करणारं ठरलं आहे.