रायपूरमध्ये ‘नीळ्या ड्रम’ प्रकरणासारखीच आणखी एक धक्कादायक घटना

0
124

रायपूर (छत्तीसगड) : काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या ‘नीळ्या ड्रम’ प्रकरणासारखीच आणखी एक धक्कादायक घटना रायपूरमध्ये समोर आली आहे. डीडी नगर पोलीस ठाणे परिसरात एका रिकाम्या प्लॉटमध्ये लोखंडी पेटीत ठेवलेली लाल रंगाची सुटकेस आढळली असून, त्या सुटकेसमध्ये सिमेंट भरून गोठवलेला एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

 

सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बेवारस लोखंडी पेटी आली. पेटी उघडून पाहिल्यावर त्यात सुटकेस दिसली. सुटकेसमध्ये सिमेंट भरून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी सिमेंट फोडल्यानंतर आत ४ ते ५ दिवस जुना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्णपणे सिमेंटमध्ये गोठलेला होता.

 

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मृतदेहाची स्थिती आणि तो लपवण्याची पद्धत पाहता हा पूर्वनियोजित खून असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ‘नीळ्या ड्रम’ हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे. पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत असून, लवकरच आरोपींचा शोध लावला जाईल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here