शिवसेना – मनसे युतीच्या शक्यतेला चालना; ‘मातोश्री’वर बैठक, माजी नगरसेवकांची सकारात्मक प्रतिक्रिया

0
72

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीच्या चर्चांना आता औपचारिक रूप मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ‘मातोश्री’वर आज  पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची भूमिका जाणून घेतली.

 

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विचारले की, “मनसेसोबत युती करायची का?” यावर अनेक माजी नगरसेवकांनी युतीस अनुकूलता दर्शवत “युती केल्यास निवडणुकीत फायदाच होईल,” असे मत व्यक्त केले. मुंबईसारख्या महानगरात शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास भगवा झेंडा पुन्हा महापालिकेवर फडकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही आमच्यासोबत उभे राहिलात, निष्ठा दाखवलीत. आगामी काळात आपल्याला अनेक रणनीती बैठका घ्यायच्या आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरच शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय सुरू करणार आहोत.”

 

यासोबतच त्यांनी स्पष्ट केलं की, “महापालिकेच्या निवडणुकीसाठी कोणाशी युती करायची याबाबत तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आणि माजी नगरसेवकांचा सल्ला घेऊनच निर्णय घेणार आहोत.”

 

दरम्यान, माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनीही बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “राज्याच्या हितासाठी जर मनसेसोबत युती झाली, तर ती स्वागतार्ह असेल. सध्या वातावरण युतीसाठी अनुकूल आहे. कार्यकर्त्यांमध्येही एकत्रित काम करण्याचा उत्साह आहे.” राज ठाकरे यांच्या “महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं विसरू” या वक्तव्यानंतर सुरू झालेली चर्चा आता राजकीय वास्तवात उतरू शकते, अशी शक्यता आता बळावली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here