बेडकाच्या उदाहरणातून महाजनांची राणेंवर बोचरी टीका

0
109

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यातील वाकयुद्ध अधिकच तीव्र झालं आहे. राणेंनी महाजनांना “लायकीपेक्षा जास्त बोलतात, उलट्या करायला लावेन,” अशी धमकीवजा टीका केल्यानंतर आता महाजनांनीही प्रत्युत्तर देताना ‘बेडका’चा उल्लेख करत राणेंची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

 

प्रकाश महाजन म्हणाले, “बेडकाला सोन्याच्या बाळण्यात बसवलं तरी तो गटारीतच उडी मारतो,” अशा शब्दांत त्यांनी राणेंवर शेलक्या शब्दांत टीका केली. “नारायण राणे यांनी संघ, देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय बोललंय हे सर्वांना ठाऊक आहे. आता भाजपचे कुठलेही नेते त्यांचं समर्थन करत नाहीत. उलट काहीजण मला फोन करून पाठिंबा देत आहेत,” असा दावा महाजन यांनी केला.

 

महाजन पुढे म्हणाले की, “मी माझ्या पक्षात काय चाललंय ते पाहतो, तुम्ही तुमचं पाहावं. तुमच्या मुलांनी ज्या भाषेत वक्तव्य केली आहेत, ती निंदनीय आहेत. आपण राजकारण करत असलो तरी भाषेचा एक दर्जा असायला हवा.”
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही प्रकाश महाजन यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला. “नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण त्यांना शोभेल अशी भाषा त्यांनी वापरावी. गल्लीछाप पद्धतीने बोलणं त्यांना शोभत नाही. आपण वेगवेगळ्या पक्षात असलो तरी मोठ्यांचा आदर राखायला हवा,” असा टोला दानवे यांनी राणेंना लगावला.

 

राजकीय वर्तुळात महाजन-राणे यांचं हे वाकयुद्ध चांगलंच गाजत असून, आगामी दिवसांत यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here