वर्धापन दिनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का?; राजकीय वर्तुळात चर्चा

0
49

माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे– राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांचेही मेळावे दणक्यात पार पडले. पुण्यातच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या दोन्ही मेळाव्याचे आकर्षण मात्र दोन्ही गटांच्या मनोमिलनाच्या प्रश्नाभोवतीच फिरत राहिल्याचे पाहायला मिळाले.

 

कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची इच्छा नेमकी काय आहे, हे दादा पक्के जाणून आहेत त्यामुळे त्यांनी ही गुगली टाकल्याची चर्चा कार्यक्रमानंतर रंगली होती. तर तिकडे खा. सुप्रिया सुळे यांनी ‘जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल, एकत्रीकरण भावा-बहिणीचा खेळ नाही’ असे सांगून टाकले.

 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाषणात पक्षातून बाहेर गेलेल्या नेत्यांपैकी कोणाचेही थेट नाव घेणे टाळले. ते म्हणाले, मूलभूत विचारांमध्ये अंतर पडले म्हणून फूट पडली आहे; पण चिंता करू नका, विचारांबरोबर राहा, जनतेशी बांधीलकी ठेवा, सत्ता आपोआप येईल. पक्षस्थापनेला २६ वर्षे झाली आहेत. सर्वसामान्यांमधूनही राज्यकर्ते तयार करता येतात, हे पक्षाने दाखवून दिल्याचेही शरद पवार म्हणाले.

 

अजित पवार गटाच्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे नेते गैरहजर होते. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. परंतु, भुजबळ आणि भरणे हे पूर्वनियोजित विदेश दौऱ्यावर आहेत, तर वळसे-पाटील यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे ते आले नाहीत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे. पक्षात चुकीचे वागणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. पक्षात गटातटाला थारा नाही. पक्ष एक परिवार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

 

अजित पवार व माझे जन्मापासूनचे नाते आहे. कुटुंबात आम्ही एकत्रच आहोत, राजकीय निर्णय करायचा तर मात्र सर्वांना विचारूनच करावा लागेल. कारण शरद पवार यांनी आमच्यावर तसेच संस्कार केले आहेत. कधी एकत्र येणार किंवा नाही याला कोणतीही कालमर्यादा नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here