शिवसृष्टी गेटवर लघुशंका प्रकरण : दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल

0
254

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|पुणे – शहरातील आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ लघुशंका करताना आढळलेल्या दाम्पत्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्मारकासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी केलेल्या या वर्तनामुळे परिसरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

 

तक्रारदार नयनाथ तुकाराम अमराळे (वय 23) हे शिक्षण घेत असून, शनिवारी पहाटे ते आणि त्यांचे रूममेट अभिजीत सितापुरे नवले ब्रिजवरून घरी जात होते. त्यावेळी शिवसृष्टीच्या गेटजवळ दोन चारचाकी गाड्या उभ्या दिसल्या. एका गाडीजवळील पुरुष व्यक्ती सूचना फलकाजवळ लघुशंका करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, तर त्याच्यासोबत एक महिला उभी होती.

 

स्थानिक रहिवासी अक्षय गायकवाड यांनी ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. यानंतर अमराळे आणि त्याच्या मित्राने संबंधित दाम्पत्याला जाब विचारला असता, त्यांनी आपली नावे अमोल अरुण कुलकर्णी (वय 59, रा. धायरी, पुणे) व पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी (वय 57) अशी सांगितली.

 

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित दाम्पत्याला पोलीस ठाण्यात आणले असून, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

शिवसृष्टी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित स्मारक असून, अशा ऐतिहासिक ठिकाणी सार्वजनिक शिस्तभंगाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here