भरधाव कंटेनरने घेतले दोन युवकांचे बळी

0
131

चाकण-आंबेठाण रस्त्यावर दुर्दैवी अपघात; ओव्हरटेक करताना कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|पुणे : चाकण-आंबेठाण रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुचाकीला ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिल्याने दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिरदवडी (ता. खेड) गावच्या हद्दीत घडली.

 

 

अपघातात सुजय दिलीप कडूसकर (वय १७) आणि सोहम उल्हास कडूसकर (वय १७, दोघे रा. कोरेगाव बुद्रुक) हे युवक मृत्युमुखी पडले. याप्रकरणी योगेश विष्णू कड (३५, रा. किवळे, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश वसुदेव मायकर (३०, रा. साळींबा, ता. वडवणी, जि. बीड) या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सुजय आणि सोहम हे कामानिमित्त दुचाकी (क्र. एमएच १४ जी एक्स ५८६०) ने चाकणकडे जात होते. बिरदवडी येथील पवार वस्तीजवळ कंटेनर (क्र. एमएच ४५ एएफ ००५४) चालवणाऱ्या गणेश मायकर याने ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघे युवक कंटेनरच्या चाकाखाली अडकले आणि त्यांना सुमारे १५ ते २० फूट फरफटत नेले.

 

फिर्यादी योगेश कड यांनी गाडी थांबवण्यासाठी आरडा-ओरडा केला; मात्र चालकाने वाहन थांबवले नाही. आजूबाजच्या नागरिकांनी हस्तक्षेप करत कंटेनर थांबवला. गंभीर जखमी अवस्थेत सुजय आणि सोहम यांना तातडीने चाकण येथील रुग्णालयात हलवले गेले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चाकण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here