
माणदेश एक्सप्रेस न्युज/मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिंदे गटाचे मराठवाड्यातील ताकदवान नेते संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या महिलेने सिद्धांत शिरसाट यांनी फसवून, धमकावून आणि भावनिक ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवले, गर्भपात करवून घेतला आणि नंतर लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
2018 साली सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर सिद्धांत आणि या महिलेचे संबंध प्रगाढ झाले. चेंबूर येथील एका फ्लॅटवर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. संबंधांतून महिलेचा गर्भधारणा झाली. मात्र, सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोप तिने आपल्या कायदेशीर नोटीसमध्ये केला आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, सिद्धांतने तिला “लग्न कर नाहीतर आत्महत्या करीन” अशा धमक्यांनी सतत भावनिकदृष्ट्या छळले. त्यामुळे तिने नवऱ्याशी घटस्फोट घेतला आणि 14 जानेवारी 2022 रोजी सिद्धांतसोबत बौद्ध पद्धतीने विवाह केला. मात्र, त्यानंतर त्याच्या वागणुकीत मोठा बदल झाला. चेंबूरच्या फ्लॅटमध्येच राहण्याचा आग्रह, संभाजीनगरला नेण्यास नकार आणि इतर महिलांसोबतचे संबंध उघड झाल्यानंतर धमक्या सुरू झाल्या, असे तिने सांगितले.
या संपूर्ण प्रकरणात 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती. मात्र, सिद्धांतचे वडील मंत्री असल्यामुळे पोलीस कारवाई थांबवण्यात आली, असा आरोपही महिलेच्या वकिलांनी कायदेशीर नोटीसमध्ये केला आहे. ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत बजावलेल्या नोटीसमध्ये सात दिवसांत महिलेला नांदवून न्याय देण्याची मागणी करण्यात आली असून, तसे न झाल्यास महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, फसवणूक आदी कलमांनुसार कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
राजकीय क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मंत्री संजय शिरसाट आणि पोलिस प्रशासन या दोघांवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.