
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मोठ्या पडद्यावर उभा करण्यासाठी अभिनेता रितेश देशमुखने निर्मित केलेल्या ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली. या मोशन पोस्टरच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रितेश देशमुखने आपल्या सोशल मीडियावरून ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे पोस्टर शेअर करत, “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन” असे भावनिक शब्द लिहिले. पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी, धगधगते रूप पाहायला मिळत असून ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या भव्य चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्याने स्वतः केलं आहे. जिनिलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अजय-अतुल यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटात संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी, भाग्यश्री अशी भव्य स्टारकास्ट असून हा चित्रपट १ मे २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याने देशभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट अनुभवता येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुण मोठ्या पडद्यावर कसे साकारले जातात, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.