
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात करवाढीच्या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारात मोठी अस्थितराता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आज मंगळवार, १५ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सकाळी ९:३० वाजता, बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स १,५६९.९० अंकांनी किंवा २.०९ टक्क्यांनी वाढून ७६,७२७.१६ वर पोहोचला आहे. तर, एनएसई निफ्टी निर्देशांक ४७३ अंकांनी किंवा २.०७ टक्क्यांनी वाढून २३,३०१.५५ वर पोहोचला आहे.
सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी, टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक ४.०८ टक्क्यांनी वाढून ६१९.३५ वर व्यवहार करत आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक २.९३ टक्क्यांनी वाढून १,८५९.६० वर व्यवहार करत आहे. तर, भारती एअरटेल २.५४ टक्क्यांनी वाढून १,८०१.९५ वर व्यवहार करत आहे. दरम्यान आज शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांकातील सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान तीन दिवसांच्या सुट्यांनंतर भारतीय निर्देशांक सकारात्मक उघडले असून, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकन शेअर बाजारात तंत्रज्ञान क्षेत्रात आलेल्या तेजीमुळे आज सकाळी आशियाई बाजारही तेजीत उघडले. जपान आणि ऑस्ट्रेलियन शेअर बाजार सकारात्मक स्थितीत उघडले. तर, दक्षिण कोरियाचे मुख्य निर्देशांक देखील वधारले आहेत. जागतिक बाजारपेठेत उत्साह दिसून येत असल्याने, आता सर्वांचे लक्ष भारतीय बाजारांवर आहे.