
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र घेण्यात आले. या शिबिरास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 72 अधिकारी/कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, मिरज भूमि अभिलेख उप अधिक्षक ज्योती पाटील, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रविंद्र आरळी व कार्यकारी संचालक प्रसाद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स व स्टाफ उपस्थित होता.
सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विषयक समस्यांवर मात करण्यासाठी आणि आरोग्यविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हे शिबिर घेण्यात आल्याचे श्री. करीम यांनी सांगितले. या शिबिरामध्ये प्राथमिक तपासणी, रक्तदाब, शुगर, ईसीजी व नेत्र तपासणी इत्यादी मोफत तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली मधील सर्व कार्यालयातील मिळून एकूण 72 अधिकारी/कर्मचारी यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.