‘कितीही षडयंत्र करा, मी आधुनिक अभिमन्यू, फडणवीसांचा पठ्ठा…’, मंत्री जयकुमार गोरेंचं विधान

0
123

माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच ‘आपलं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी शरद पवारांच्या पुढे कधीही झुकणार नाही’, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी टीका केली होती.

 

यानंतर आता जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक सूचक विधान केलं आहे. ‘कितीही षडयंत्र करा, पण मी आधुनिक अभिमन्यू आहे, देवेंद्र फडणवीस यांचा पठ्ठा आहे’, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कोणाकडे होता? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

 

“माझा ते पराभव करू शकले नाहीत. त्यांनी सर्व ताकद पणाला लावली. सर्व बाजूंनी मग त्यामध्ये पक्षामधून आणि पक्षाच्या बाहेरून ताकद लावली पण तरीही माझा पराभव करू शकले नाहीत. तेव्हा षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला. असे कितीतरी षडयंत्र रचले, कितीही चक्रव्यूह टाकले तरीही मी देखील आधुनिक अभिमन्यू आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पठ्ठ्या आहे हे लक्षात ठेवा”, असा सूचक इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

 

मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना एक प्रकारे भाजपात येण्याची ऑफर दिली. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “शहाजी बापू पाटील यांनी काही वेळापूर्वी सांगितलं की फक्त भाषण करून पाणी येत नाही. आता मी एवढंच सांगतो बिना पाण्याच्या विहिरीत उडी मारायची नाही. देवाभाऊंच्या विहिरीत मुबलक पाणी आहे, तिकडेच विचार करायचा. पाणी असूनही द्यायला नको का? मात्र, पाणी देण्यासाठी दानत लागते. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की आपण सर्व गोष्टींचा विचार करायचा, तसेच आपल्या तालुक्याला कोण काय देणार? याचाही विचार आपण केला पाहिजे”, असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार बाबासाहेब देशमुखांना ऑफर दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here