झरेतील जिल्हा बँकेत मध्यरात्री थरारक दरोडा ! 22 लॉकर फोडून कोट्यवधींचा ऐवज लंपास ; सांगली जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी; पोलिसांसमोर मोठे आव्हान

0
1

माणदेश एक्सप्रेस न्यूज / आटपाडी / प्रतिनिधी : झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री अत्यंत सुनियोजित पद्धतीने जबरी दरोडा टाकून बँकेच्या स्ट्रॉंग रूममधील तब्बल २२ लॉकर फोडत कोट्यवधी रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा बँकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी मानली जात असून या घटनेमुळे संपूर्ण आटपाडी तालुक्यासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

झरे येथील स्टँड परिसरात तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर ही बँक शाखा कार्यरत आहे. काल मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. बँकेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि कोणतीही घाई न करता थेट स्ट्रॉंग रूमकडे मोर्चा वळवला. चोरट्यांकडे गॅस कटरसह अत्याधुनिक साधने असल्याचे घटनास्थळी आढळून आलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होते. त्यांनी एकामागोमाग एक अशा २२ लॉकर फोडून त्यामधील ग्राहकांनी सुरक्षिततेच्या विश्वासावर ठेवलेले सोने, चांदी व रोख रक्कम चोरून नेली.

चोरी करताना पकडले जाऊ नये यासाठी चोरट्यांनी पूर्ण दक्षता घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. चोरीच्या वेळी त्यांनी हातमोजे वापरल्याने ठसे मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. तसेच बँकेत प्रवेश करताच सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून संपूर्ण रेकॉर्डिंग असलेला डीव्हीआरही ताब्यात घेतल्याने पोलिस तपासास मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या चोरीसाठी चोरट्यांनी पूर्वतयारी व रेकी केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळी नेहमीप्रमाणे बँकेचे कर्मचारी शाखेत आल्यानंतर स्ट्रॉंग रूमची अवस्था पाहून त्यांना मोठा धक्का बसला. तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बँकेचे लॉकरधारक ग्राहक मोठ्या संख्येने शाखेत जमा झाले. अनेक ग्राहकांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टाची पुंजी या लॉकरमध्ये ठेवलेली असल्याने वातावरण अत्यंत तणावपूर्ण व भावनिक झाले होते.

घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांना पाचारण करून तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा, तांत्रिक तपास तसेच गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चोरीची व्याप्ती मोठी असल्याने जिल्हास्तरावरूनही तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेता घटनास्थळी आम. गोपीचंद पडळकर, बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पोलीस उपअधीक्षक कल्पना बारवकर तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विशेष म्हणजे याच शाखेत सुमारे एक वर्षापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. मात्र त्यानंतरही सुरक्षा यंत्रणा पुरेशी मजबूत करण्यात आली नसल्याने अखेर चोरट्यांनी मोठा डाव साधल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील बँकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार या चोरीत सुमारे सात किलो सोने, वीस किलो चांदी तसेच रोख रक्कम लंपास झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अचूक नुकसानाचा आकडा लॉकरधारकांची माहिती संकलित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. लॉकरमधील ऐवज चोरीस गेल्यानंतर भरपाईबाबत बँकेचे धोरण अद्याप स्पष्ट नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. या चोरीमुळे केवळ आर्थिक नुकसानच झाले नसून बँकिंग व्यवस्थेवरील ग्राहकांचा विश्वासही हादरल्याचे चित्र आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here