सांगलीत युवकांचे ‘चला नदीकडे अभियान’ ! कृष्णा नदी स्वच्छता मोहीम

0
164

माणदेश एक्सप्रेस/सांगली : संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेचे अविरत काम करणाऱ्या निर्धार फाउंडेशनच्या ४० युवकांनी चला नदीकडे अभियान राबवत कृष्णा नदी स्वच्छतेची मोहीम राबवून सुमारे २ टन कचरा संकलित केला.

 

 

गेल्या काही वर्षांत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी या समस्येची जाणीव ठेवून नदीच्या संवर्धनासाठी पुढे यावे, या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

 

 

पहिल्याच दिवशी ४० स्वच्छतादूतांनी अवघ्या २ तासांत सरकारी घाट आरशासारखा स्वच्छ केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनवरून अनेक सामाजिक संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पुढील काही दिवसांत या उपक्रमात नागरिकांचा आणखी मोठा सहभाग अपेक्षित आहे.

 

 

निर्धार फाउंडेशनच्या वतीने सांगली शहरात स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाच जणांना प्रतिवर्षी संत गाडगेबाबा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 

 

या उपक्रमात सतीश दुधाळ, मुस्तफा मुजावर, शशिकांत ऐनापुरे, हिमांशु लेले, रंजीत चव्हाण, मोहन शिंदे, सचिन ठाणेकर, पवन ठोंबरे, दादा शिंदे, सुरज कोळी, अनिल अंकलखोपे, भाग्यश्री दिवाळकर यांसह मोठ्या संख्येने स्वच्छतादूतांनी सहभाग घेतला.

 

 

नदी ही आपल्या जीवनाचा आधार आहे. तिची स्वच्छता व संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. गेल्या २१ दिवसांपासून आम्ही कृष्णामाईसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवत आहोत. पण ही चळवळ अधिक व्यापक व्हावी, म्हणून संत गाडगेबाबा जयंतीच्या निमित्ताने ‘चला नदीकडे जाऊया’ अभियान सुरू केले. पहिल्याच दिवशी नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून, अनेक सामाजिक संघटनाही या मोहिमेत सहभागी होत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here