आगामी डॉक्टूमेंट्रीची चर्चा सुरु असताना अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सलीम खान म्हणाले, सुरुवातील मी जावेद अख्तर आणि हनी ईराणी यांच्या लग्नात जाण्यासाठी नकार दिला होता. हनी इराणी माझी खूप चांगली मैत्रीण होती…
खान आणि अख्तर कुटुंब बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. दोन्ही कुटुंबामध्ये मैत्रीपूर्ण संबंध देखील आहेत. लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं आहे. आता सलीम खान – जावेद अख्तर यांची डॉक्टूमेंट्री ‘Angry Young Men’ प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होत आहे. सध्या सर्वत्र डॉक्टूमेंट्रीची चर्चा रंगली आहे.
पुढे सलीम खान म्हणाले, ‘सीता और गीता’ सिनेमाच्या कास्टिंग दरम्यान जावेद अख्तर यांनी हनी यांचं नाव मला सुचवलं होतं. जावेद यांचा हनी इराणी यांच्यावर जीव जडला होता. पण हनीच्या आईने जावेद यांना सांगितलं की, ‘तुमचं रोजचं येणं मला आवडत नाही. त्यामुळे लग्न करून घ्या…’
पण जेव्हा जावेद अख्तर यांनी हनी यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा खास मित्र सलीम खान यांनी लग्नाला येण्यास आणि साक्षीदार होण्यास नकार दिला. जावेद अख्तर यांनी यामागचं कारण विचारल्यानंतर सलीम खान म्हणाले, ‘मी ज्या लग्नामध्ये साक्षीदार म्हणून गेलो आहे, त्यांचा संसार मोडला आहे…’
यावर जावेद अख्तर म्हणले, ‘अंधश्रद्धेवर मला बिलकूल विश्वास नाही. मला या सर्व गोष्टींवर विश्वास नाही. तुम्ही माझ्या लग्नात साक्षीदार म्हणून याल….’ असा प्रेमळ हट्ट जावेद अख्तर याने सलीम खान यांच्याकडे केला. पण अखरे सलीम खान यांचे शब्द खरे ठरले.
सांगायचं झालं तर, जावेद अख्तर यांनी 1972 मध्ये हनी इराणी यांच्यासोबत पहिलं लग्न केलं. लग्नानंतर हनी यांनी मुलगा फरहान अख्तर आणि मुलगी झोया अख्तर यांना जन्म दिला. पण दोन मुलांच्या जन्मानंतर देखील जावेद अख्तर आणि हनी इराणी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 1978 मध्ये जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा घटस्फोट झाला.
हनी इराणी यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी काही वर्षांनंतर अभिनेत्री शबाना आजमी यांच्यासोबत लग्न केलं. 1984 मध्ये शबानी आजमी आणि जावेद अख्तर यांनी लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर जावेद अख्तर आनंदी आयुष्य जगत आहेत.