मॉर्निंग वॉकला गेलेले माजी सरपंच कारच्या धडकेत जागीच ठार, आठजण जखमी ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
147

माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोकरुड :
शिराळा तालुक्यातील येळापूर ग्रामस्थ आणि माजी सरपंच जयवंत काशीनाथ कडोले (वय ४६) यांचा आज (बुधवारी) सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. कराड-शेडगेवाडी मार्गावर ही दुर्घटना घडली. अपघातात चारचाकीतील आठ जण जखमी झाले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे येळापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


नेहमीप्रमाणे सकाळी जयवंत कडोले मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. परतीच्या वाटेवर अंबरनाथहून भुईबावडा (ता. राजापूर) कडे जाणारी चारचाकी (क्र. एमएच ०४ डीएच ०३६९) अचानक अनियंत्रित झाली. चालक परशुराम अनिल नकवाल (वय ४२, रा. अंबरनाथ, कल्याण, ठाणे) याचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव गाडीने जयवंत कडोले यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक एवढी जबरदस्त होती की, कडोले यांचा जागीच मृत्यू झाला.


गाडीत प्रवास करणारे संजय सीताराम मोरे (५४), अंकिता संजय मोरे (३९), स्नेहल संजय मोरे (१७), आर्या संजय मोरे (१४), कनिष्का संजय मोरे (११) आणि सारस संजय मोरे (९, सर्व रा. अंबरनाथ, कल्याण, ठाणे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्वांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


जयवंत कडोले हे येळापूरचे माजी सरपंच म्हणून ओळखले जात होते. गावातील सामाजिक व राजकीय कामात ते सक्रिय होते. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
मागे त्यांच्यावर पत्नी, मुलगा, मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे.


या अपघाताची नोंद सागर किसन कडोले यांनी कोकरुड पोलिसात दिली आहे. पोलिस निरीक्षक जयवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार कालिदास गावडे अधिक तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here