
माणदेश एक्सप्रेस न्युज|कोल्हापूर – रायगड किल्ल्याच्या उत्खननात एक महत्त्वाचे ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण – ‘यंत्रराज सौम्ययंत्र’ (Astrolabe) आढळले आहे. या उपकरणाच्या शोधामुळे शिवकालीन स्थापत्यात खगोलशास्त्राचा वापर झाल्याचे महत्त्वपूर्ण पुरावे पुढे आले आहेत. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबतची माहिती रविवारी सोशल मिडियाद्वारे दिली.
भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन-चार वर्षांपासून रायगड किल्ल्यावर विविध ठिकाणी उत्खनन सुरु आहे. रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस, कुशावर्त तलाव परिसरात, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर तसेच वाडेश्वर मंदिर परिसरात हे उत्खनन केले जात आहे. याच उत्खननात कुशावर्त तलावाच्या वरील भागात व ऐतिहासिक वाड्याच्या जागी ‘यंत्रराज’ सापडले.
या प्राचीन उपकरणावर मुख आणि पूंछ अशी अक्षरे कोरलेली असून, त्यावर कासव आणि सापाच्या आकारांचे कोरीव छाप आहेत. हे चिन्ह दिशा ओळखण्यासाठी वापरले जात होते. या उपकरणाचा वापर शिवकालीन वास्तुरचनेदरम्यान खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी केला गेला असावा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
प्राचीन काळात ‘यंत्रराज’ अथवा ‘सौम्ययंत्र’ खगोलशास्त्रीय गणना, वेळ मोजणे, ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण, दिशा ठरवणे यासाठी वापरले जात असे. रायगडावर आढळलेले हे उपकरण तत्कालीन स्थापत्यकलेतील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे दर्शन घडवते. “या अमूल्य ठेव्यामुळे इतिहास अभ्यासकांना संशोधनाची मोठी संधी मिळणार आहे,” असे संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.