वर्ल्ड कप विजयानंतर भाजप खासदराची मोठी घोषणा! महिला क्रिकेटर्सना डायमंड ज्वेलरी व सोलार सिस्टम भेट

0
199

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी मुंबई :

भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक 2025 स्पर्धेत इतिहास रचत प्रथमच विश्वविजेतेपद पटकावले आहे. रविवारी डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या उत्कट लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 53 धावांनी मात करून संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला. या ऐतिहासिक विजयाचा उत्साह आणि समाधान देशभरात पाहायला मिळत आहे. लाखो जनतेसोबतच उद्योगक्षेत्र आणि राजकीय क्षेत्रातूनही महिला खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव करण्यात येत आहे.

अशातच राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध हिरे उद्योजक गोविंद ढोलकिया यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयाचा उत्सव अधिक खास बनवत मोठी घोषणा केली आहे. विजयी संघातील प्रत्येक खेळाडूला नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने भेट देण्याबरोबरच त्यांच्या घरांवर सौर ऊर्जा प्रणाली बसवून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. समाजभिमुख वृत्ती आणि राष्ट्रनिष्ठ भावनेने प्रेरित असलेल्या या घोषणेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.


गोविंद ढोलकिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना पत्र लिहून या उपक्रमाची अधिकृत माहिती दिली. पत्रात त्यांनी म्हटले आहे —

“भारतीय महिला क्रिकेटपटूंनी फक्त देशाचं नाव उजळवलं नाही, तर सिद्ध केलं आहे की स्त्रीशक्ती कोणत्याही आव्हानासमोर डगमगत नाही. त्यांचा हा ऐतिहासिक विजय पुढील पिढीतील मुलींना स्वप्न पाहण्याची, त्यासाठी लढण्याची आणि ती स्वप्नं पूर्ण करण्याची प्रेरणा देईल.”

ढोलकिया पुढे म्हणाले,

“विश्वचषक जिंकणे हे केवळ क्रीडाविश्वातील यश नाही, तर आत्मविश्वास, जिद्द आणि सामूहिक प्रयत्नांची मोठी कहाणी आहे. प्रत्येक भारतीयासाठी आजचा दिवस खास आहे आणि या मुलींनी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरलं आहे.”


गोविंद ढोलकिया हे उदारमनाचे उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांनी अयोध्येतील राम मंदिर बांधकामासाठी तब्बल 11 कोटी रुपयांचे देणगी दिली होती. त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरे आणि कार भेट म्हणून देण्याचा उदात्त इतिहासही त्यांचा आहे.

महिला क्रिकेटपटूंना सन्मान देण्याची त्यांची ही घोषणा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून क्रीडारसिकांकडून त्यांचं कौतुक होत आहे. मात्र, या प्रस्तावाबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम भारतीय महिला संघाने साधला आहे. 299 धावांच्या कठीण टार्गेटचा बचाव करत भारताने दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 246 धावांवर रोखला. शेफाली वर्माने दमदार प्रदर्शन करत ‘वूमन ऑफ द मॅच’चा मान मिळवला. तिला बॅट आणि बॉल दोन्ही क्षेत्रात शानदार कामगिरीसाठी गौरवण्यात आले.

या विजयानंतर देशभरात आतषबाजी, जल्लोष आणि भारतीय तिरंग्याची उधळण दिसली. छोट्या गावापासून महानगरापर्यंत आणि ग्रामीण भागातील क्रिकेट चाहत्यांपासून शालेय मुलांपर्यंत, सर्वत्र आनंदाचा माहोल आहे. क्रिकेट प्रेमींनी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला.

भारताने महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावत चौथा असा संघ म्हणून नावलौकिक मिळवला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतर भारताचे नाव या यादीत अभिमानाने जोडले गेले आहे.


या यशाने भारतातील महिला क्रीडाक्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. पारंपरिक बंधने मोडून महिलांनी क्रीडा विश्वात उंच भरारी घेण्याचा मार्ग अधिक खुला झाला आहे. देशातील अनेक तरुणींना क्रिकेट आणि इतर क्रीडा प्रकाराकडे वळण्याची नवी ऊर्जा यातून मिळणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने देशाला दिलेला हा अभिमानास्पद क्षण इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहील. त्यांच्या जिद्दीला सन्मान देण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून स्तुतीचा वर्षाव होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here