
माणदेश एक्सप्रेस न्युज
जत : देशभरातील महाविद्यालयीन तरूणी व महिला यांच्यावरील वाढते हल्ले, छेडछाडीचे प्रकार व अत्याचार पाहता विद्यार्थीनीने आता आत्मनिर्भर झाले पाहिजे. महिलांनी अडचणीच्या वेळी स्वतःचे संरक्षण स्वतः:ला करता आले पाहिजे, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी शिवनेरी केदार यांनी केले.
त्या राजे रामराव महाविद्यालय, जत येथे महिला सबलीकरण कक्ष, अंतर्गत तक्रार निवारण समिति व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “महिला स्वसंरक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या” सांगता समारंभप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.महादेवकरेन्नवार हे होते.
या दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी महाविद्यायातील ५० विद्यार्थिनींना कराटे व योगा चे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी प्रशिक्षिका म्हणून शीतल बामणे व शारीरिक शिक्षक संचालक प्रा.अनुप मुळे यांनी मुलींना योगा व कराटेचे प्रशिक्षण दिले.या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समन्वयक प्रा.लता करांडे यांनी काम पाहिले.
यावेळी पुढे बोलताना महिला व बालविकास अधिकारी शिवनेरी केदार म्हणाल्या की, भारतात महिला सक्षमीकरण करण्यासाठी सर्वप्रथम समाजातील हुंडा प्रथा, लैंगिक हिंसा, भ्रूणहत्या, घरगुती हिंसाचार यासारख्या राक्षसी विचारांना मारले पाहिजे. महिलांना चांगले शिक्षण देऊन सक्षम केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य महादेव करेन्नवर म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणा बरोबरच त्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणेवर भर दिला पाहिजे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.संगीता देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अमृता आलुर हिने तर आभार प्रा.लता करांडे यांनी मानले. या कार्यक्रमास महिला सबलीकरण कक्षाच्या डॉ. मधुमति शिंदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ.शिवाजी कुलाल, प्रा.जयश्री बालिकाई, प्रा.ललिता सपताळ, प्रा.जयश्री मोटे, प्रा.शिल्पा पाटील, प्रा.देवयानी करे, प्रा.भाग्यश्री माळी व महाविद्यालयातिल विद्यार्थिनी उपस्थित होत्या.