अपघातात महिलेचा मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक; पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको, उड्डाणपुलाची मागणी

0
17

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|पुणे : एकलहरे गावच्या हद्दीत दुचाकी व बसच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत तीव्र आंदोलन छेडले. सकाळी सुमारे ११ वाजता मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अडवून आंदोलकांनी उड्डाणपुलाच्या मागणीसाठी महामार्ग ठप्प केला.

 

मृत महिलेचे नाव रूपाली प्रणाल पडवळ (रा. एकलहरे) असे असून रात्री उशिरा दुचाकीवरून जात असताना एका एसटी बसने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी वारंवार दुर्घटना घडत असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

 

एकलहरेसह कळंब, महाळुंगे पडवळ, साकोरे, विठ्ठलवाडी, टाकेवाडी या परिसरातील चार-पाच गावातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

प्रशासनावर संताप, ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, पोलीस आणि आंदोलक यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी “तातडीने छोटा उड्डाणपूल मंजूर करा”, “ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात वाढले, गुन्हा दाखल करा” अशा जोरदार मागण्या केल्या.

 

पोलीस हस्तक्षेप आणि तडजोडीचा मार्ग
पोलीस हस्तक्षेप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अरुण चौधरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. येत्या १८ जून रोजी एकलहरे येथे महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

 

आंदोलनकर्त्यांचा इशारा
“दहा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडू, यावेळी कोणाचेही ऐकले जाणार नाही”, असा इशारा हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिला.

 

प्रमुख उपस्थित: माजी सरपंच संतोष डोके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, संदीप शिंदे, दीपक चिखले, रीना डोके, पोलीस पाटील सुमन फलके यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गालगत असलेली अडथळा ठरणारी झाडे काढण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. परंतु, स्थानिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत असंतोष शमणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here