
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं दिसून येत आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत असून, दुसऱ्या दिवशी आंदोलनाची तापलेली पार्श्वभूमी लक्षात घेता अखेर सरकार हलले आहे.
आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. या बैठकीला चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, उदय सामंत यांसह सर्व सदस्य उपस्थित होते. बैठक दीर्घकाळ चालली आणि विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना विखे पाटील यांनी सांगितले की, “सर्व सदस्य अतिशय सकारात्मक भूमिकेतून चर्चा करत आहेत. सरकारची ठाम भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे. त्यासाठी न्यायमूर्ती शिंदे, कोकणचे विभागीय आयुक्त आणि संबंधित सचिव हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी जाणार आहेत.”
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा दुसरा दिवस गाठला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. या भूमिकेमुळे मराठा समाजामध्ये आक्रमकता वाढली असून, सरकारवरील दबाव शिगेला पोहोचला आहे. सुरुवातीला शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेणार नाही अशी चर्चा होती. मात्र, आज अखेर परिस्थिती बदलली आणि सरकारकडून शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
आज दुपारी किंवा संध्याकाळी जरांगे पाटलांसोबत सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. या चर्चेतून तोडगा निघेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विखे पाटील यांनी स्पष्ट केलं की, जर चर्चेत काही नवीन मुद्दे समोर आले तर त्यावर पुन्हा उपसमितीच्या पातळीवर चर्चा केली जाईल.
आझाद मैदानावर जमलेल्या मराठा बांधवांची एकच मागणी आहे – “आरक्षण तातडीने मिळालं पाहिजे, आता विलंब मान्य नाही.” आंदोलनाला महिलांचा आणि तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या घडामोडींवर केंद्रीत झालं आहे.