
माणदेश एक्सप्रेस न्यूज
सांगली : सांगली जिल्ह्यातील संजयनगर येथील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात महत्त्वाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी सांगलीचे खासदार श्री विशाल पाटील यांचे जिवलग सहकारी तसेच माजी नगरसेवक श्री मनोज सरगर यांचे भाजपात प्रवेश झाल्यामुळे पक्षाचे मनोबल आणखी उंचावले आहे.
मनोज सरगर यांच्यासोबतच माजी महापौर कांचन कांबळे, शुभांगी सांळुखे, महेश सांळुखे, माजी सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे, माजी नगरसेविका आशा शिंदे, बाळासाहेब बंडगर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपात सामील झाले आहेत. या नव्या सामील झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या ताकदीला नवी उंची दिली असून, आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या विजयाची खात्री अधिक बळकट झाली आहे.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपचा विकासाचा वेग आणि जनतेशी असलेला नाते यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत निश्चितच महापौरपद पक्षाला मिळणार आहे.” त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यातील विकासाच्या गतीवर भर देत, महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या विकासातल्या अडचणी आता दूर होत आहेत, असे सांगितले. ग्रामीण तसेच शहरी भागांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून, विशेषतः शेतकरी व कष्टकरी वर्गाला प्राधान्य देण्यात येत आहे. याशिवाय सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी येत्या काळात ठोस योजना राबवण्याचा मानस असून, महापालिका क्षेत्राच्या प्रत्येक भागातील प्रगतीसाठी शंभर टक्के अंमलबजावणी केली जाईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप महामंत्री राजेश पांडे, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक (ग्रामीण), प्रकाश ढंग (शहर), समित कदम, निता केळकर, माजी आमदार रमेश शेंडगे, नितीन शिंदे, दिनकर पाटील, संचालक चिमण डांगे यांसह अनेक मान्यवर उस्प्ठीत होते.
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष कौतुक करत सांगितले की, “जिल्ह्याच्या समस्यांवर काम करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात सक्षम नेतृत्व तयार झाले आहे. मनोज सरगर यांच्या प्रवेशामुळे भाजपाला हनुमानाची शक्ती आणि भाजपचे बळ मिळाले आहे, ज्यामुळे आगामी निवडणुका निश्चितच भाजपच्या विजयासाठी मोलाचा ठरतील.”
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, “भाजप हा सर्व समाजघटकांचा पक्ष आहे, जो जाती-धर्मांच्या भिंती ओलांडून विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे.” अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा हा पुतळा ६० दिवसांच्या आत उभारला जाईल. तसेच त्यांनी संजयनगरच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व मागण्यांची यादी तयार करून सादर करण्याचे आवाहन केले आणि त्या मागण्यांची पूर्ण पूर्तता करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शासनाच्या निर्णयानुसार मुलींच्या शिक्षणासाठी ८४२ अभ्यासक्रमांची फी माफ करण्याचा निर्णयही पालकमंत्र्यांनी सांगितला, ज्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठा दिलासा मिळणार आहे. हा निर्णय मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.
या मेळाव्यामुळे भाजपमध्ये नवे उमेदवार व कार्यकर्ते जोडले गेले आहेत आणि पक्षाचे स्थान आणखी दृढ करण्यास हातभार लागणार आहे. सांगली जिल्ह्यातील लोकसंख्या व विकासाच्या दृष्टीने महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी ही घटना मोठे संकेत देणारी ठरणार आहे.
सांगलीतील संजयनगर येथील या कार्यक्रमाने राजकीय वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण केली असून, आगामी काळात भाजपची भूमिका आणखी सशक्त होईल, असा विश्वास कार्यकर्ते आणि नेते यांना आहे. आगामी निवडणुकीत विजयासाठी सर्व स्तरांवर सक्रिय होण्याचे आवाहन या कार्यक्रमात करण्यात आले.