
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याचे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. “सप्टेंबरपर्यंत वाट पाहा,” असे सांगत त्यांनी राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत झालेली गुप्त भेट, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली मुक्काम यामुळे उलथापालथीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांना स्पष्टपणे सांगितले की, या मित्रपक्षांबरोबर काम करणं आता अशक्य झालं आहे. सरकारची प्रतिमा धुळीला मिळतेय. आता निर्णय घ्यावा लागेल.” त्यांनी असेही स्पष्ट केलं की, लवकरच काही मोठी कारवाई होणार असून राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
‘मंत्री अडचणीत येणार’ – राऊतांचा दावा
वसई प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत म्हणाले, “हे सरकार कलंकित आहे. वसईच्या आयुक्तांवर पडलेल्या धाडीमुळे हजार कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश होणार आहे. त्या प्रकरणात एक मंत्री अडचणीत येतील. त्यांनाही जावं लागेल. नव्या क्रीडामंत्र्यांना योग्य खाते दिलं गेलंय, पण त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.”
खातेबदल म्हणजे फक्त वरवरचं पाऊल?
राऊतांनी केलेल्या आरोपानुसार, सध्याचे खातेबदल म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी केलेली थातूरमातूर कारवाई आहे. “मंत्री आणि त्यांचे बॉस आपल्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला.
‘फडणवीस ओझ्याखाली दबलेत’
राऊत पुढे म्हणाले, “संपूर्ण सरकारचं ओझं आता देवेंद्र फडणवीसांवर आहे. त्यांनाही हे ओझं झटकून टाकायचं आहे.” शाह-फडणवीस भेटीतील तपशील माझ्याकडे असल्याचेही त्यांनी सूचित केले.
राजकीय वर्तुळात चर्चा तेजीत
राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात नेमकं काय होणार, राज्यात सत्तास्थितीत कोणते बदल घडतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेषतः शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर येणार का, यावर चर्चा रंगू लागली आहे.