
माणदेश एक्सप्रेस न्यूज :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील गळती रोखण्याचं आव्हान आता शिंदे गटासमोर उभं राहिलं असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी या घडामोडी राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
मागील आठवड्यात शिंदे यांचे विश्वासू आणि सोलापुरातील जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी 31 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या पावलानंतर जिल्ह्यातील राजीनामा सत्र वेगाने सुरू झालं. ताज्या घडामोडीत माढा तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी 16 पदाधिकाऱ्यांसह शिंदे सेनेचा राजीनामा देत पक्षाला धक्का दिला आहे.
मुन्ना साठे यांनी या गळतीसाठी पंढरपूरचे महेश साठे आणि संजय कोकाटे यांना थेट जबाबदार धरले आहे. “मागील दोन महिन्यांपासून चुकीच्या लोकांना पदवाटप केल्याने जिल्ह्यात सेनेची अवस्था बिघडली आहे. शिवाय पक्षाच्या निरीक्षकांसह वरिष्ठांना चुकीची माहिती पुरवण्यात आली. या कुरघोडीमुळे आम्ही राजीनामा देत आहोत,” असं साठे यांनी स्पष्ट केलं.
सोलापुरातील या सलग गळतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटासाठी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पक्ष नेतृत्वाने यावर तातडीने पावलं उचलली नाहीत, तर निवडणुकीत याचा थेट परिणाम भोगावा लागू शकतो.