
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटलेला असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अहमदनगर (अहिल्यानगर) येथील एका कार्यक्रमात केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन सुरू आहे. संपूर्ण राज्यभरातून आंदोलकांनी मुंबईत हजेरी लावल्यामुळे भगव्याचं वादळ उसळलं आहे. अशा पार्श्वभूमीवर पवारांनी केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, “तामिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण लागू शकतं, तर संविधानात दुरुस्ती करून महाराष्ट्रातही आरक्षण देता येऊ शकतं. घटनेत बदल करण्याची तयारी दाखवली, तरच हा वाद कायमचा सुटू शकतो.”
त्यांच्या या विधानाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजात नवीन उर्जा निर्माण झालेली दिसते.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात आंदोलकांची ठाम मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे.
सरकारकडे वारंवार चर्चा आणि मागण्यांनंतर देखील तोडगा निघालेला नाही. यामुळे समाजातील असंतोष वाढताना दिसत आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांकडे प्रश्न केला होता की, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचे की नाही याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडावी.
यावर पवारांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरत असून त्यांनी थेट संविधान दुरुस्तीचाच मार्ग योग्य असल्याचे सांगितले आहे. यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडू शकते.
आरक्षणाव्यतिरिक्त शरद पवार यांनी शेतीविषयीही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की,
शेतकऱ्यांच्या जमिनी दिवसेंदिवस कमी होत आहेत.
विकासाच्या नावाखाली शेती कमी होत असून शेतीवर अवलंबून घटक मात्र वाढतोय.
अशा परिस्थितीत तांत्रिक बाबींचा विचार करून शेती करणे आवश्यक आहे.
शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करायला हवा.
रयत शिक्षण संस्थेने यासाठी प्रयत्न सुरू केले असून समाजाने याला सहकार्य करावे.