
मुंबई / सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) –
राज्यातील साडेतीन शक्तिपीठे, दोन ज्योतिर्लिंगे, अंबेजोगाई व पंढरपूर यांसह १८ प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. १२ जिल्ह्यांतील शेतकरी, ग्रामस्थ यांच्याकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध होत असतानाच, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकल्पासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राणे म्हणाले, “शक्तिपीठ महामार्ग हा फक्त एक रस्ता नाही, तो धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाचं दार उघडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. मात्र, काही भागांमध्ये – विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात – गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि प्रत्येक नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवण्यात येईल.”
२० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी, मात्र विरोध वाढतोय
महामार्गासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यात भूसंपादन, रस्ते विकास आणि पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. मात्र, प्रकल्पाच्या रेषेत येणाऱ्या गावांतील नागरिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. शेती उद्ध्वस्त होईल, घरं विस्थापित होतील, मोबदला अपुरा मिळेल अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत.
“सध्याचा प्लॅन सिंधुदुर्गच्या हिताचा नाही” – राणेंचा सवाल
“सध्याचा शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बांदा शहर आणि अन्य भागांना बाधित करतोय. शिवाय, हा महामार्ग थेट गोव्याच्या दिशेने जातोय, त्यामुळे सिंधुदुर्गला काय फायदा? महाराष्ट्राला काय लाभ?” असा स्पष्ट सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. त्यांनी याबाबत मंत्रिमंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“१०१ टक्के प्लॅन बदलणार” – दोन पर्यायी मार्गांची चर्चा
राणे यांनी पुढे सांगितले की, “आम्ही दोन पर्यायी मार्ग सुचवले आहेत. एक झिरो पॉईंट आणि दुसरा मळगाव मार्ग. या मार्गांनी गेल्यास शेतीचे नुकसान कमी होईल आणि स्थानिक विकास अधिक होईल. आम्ही १०१ टक्के सध्याचा प्लॅन बदलणार आहोत. लोकांच्या फायद्याचा महामार्गच मंजूर होणार आहे.”
त्यांनी याचबरोबर हेही स्पष्ट केलं की, कोस्टल रोड मार्गे हा महामार्ग रेडी बंदरकडे वळवता आला, तर व्यापार, पर्यटन आणि स्थानिक रोजगारास चालना मिळेल.
“ज्यांना लोकांनी नाकारलं, ते लोकांची माथी भडकवत आहेत” – विरोधकांवर टीका
महामार्ग प्रकल्पाला मिळणाऱ्या विरोधावर राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “विरोध करण्याची काही नौटंकी सुरू आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमच्यावर लोकांचा विश्वास आहे. ज्यांना लोकांनी घरी बसवलं आहे, ते आता लोकांची माथी भडकवत आहेत. त्यांना काही प्रश्न असतील, तर आम्ही संवादासाठी तयार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रकल्प लोकांच्या सहमतीशिवाय राबवणार नाही” – आश्वासन
शेतकऱ्यांच्या आक्रोशाबाबत बोलताना राणे म्हणाले की, “कोणाच्या शेतीवर हा महामार्ग गेला, तर त्यांना योग्य मोबदला दिला जाईल. कुणावर अन्याय होणार नाही, मात्र विरोधही केवळ राजकीय हेतूने होऊ नये.”
ते पुढे म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग हा ‘फास्ट ट्रॅक’ प्रकल्प नसून ‘पीपल्स ट्रॅक’ प्रकल्प आहे. लोकांचा सहभाग आणि हित लक्षात घेऊनच हा रस्ता बनवला जाईल. हा महामार्ग केवळ रस्त्यांपुरता मर्यादित नाही, तर तो धार्मिक पर्यटन, आर्थिक प्रगती, ग्रामीण रोजगार आणि शेती उत्पादकतेला चालना देणारा प्रकल्प ठरेल.
“विकास हीच आमची जबाबदारी” – नितेश राणे
“नारायण राणे, दीपक केसरकर आणि मी – आम्ही तिघंही सिंधुदुर्ग व कोकणातील लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. लोकांनी आम्हाला विकासासाठी निवडून दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संवाद साधूनच योग्य मार्ग काढू,” असे राणे यांनी ठामपणे सांगितले.