
माणदेश एक्सप्रेस न्यूज :- राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेट घेत आहे. मराठा बांधव मुंबईत एकवटून मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. मुसळधार पावसात आणि चिखलात बसून देखील आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट मागणी केली आहे.
राऊत म्हणाले, “मराठी माणूस पावसात भिजतोय, चिखलात बसला आहे. महाराष्ट्रासाठी हे काय चित्र बरोबर आहे का? केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे. जर हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असेल, तर केंद्रात सुद्धा आपलं सरकार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीमध्ये मोठं वजन आहे. फडणवीसांचं वजन मोदींकडे आहे, तर शिंदेंचं वजन अमित शहांकडे आहे. मग या दोन्ही नेत्यांनी मन वळवून वेगळा कायदा करावा. महाराष्ट्रासाठी पावसात रस्त्यावर बसलेल्या मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे.”
आरक्षणाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “आरक्षणासाठी संविधानात बसणारे मार्ग शोधावे लागतील. फक्त आश्वासन देऊन दोन समाजांना एकमेकांसमोर उभं करता येणार नाही. आम्ही संविधानाच्या चौकटीत तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत.” असं विधान केलं होतं.
यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “आम्हाला संविधानाच्या गोष्टी सांगू नका. राजकीय इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य आहेत. संविधान बदलून तुम्ही आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी तरतुदी केल्या. गुन्हा दाखल झालेल्या मंत्री-मुख्यमंत्र्यांनी ३० दिवसांत पद सोडावं यासाठी बदल केला. मग मराठा समाज आर्थिक-सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलाय, त्यासाठी संविधान बदलायला काय हरकत आहे?”
राऊतांनी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या काही नेत्यांवरही टीका केली. ते म्हणाले, “हे जे लोक समाजाचं नेतृत्व करताहेत, ते फडणवीसांचे चेले आहेत. फडणवीस सांगतात तसं तेच करत आहेत.”