दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घोषित केला आहे. त्यामुळे, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसवणार आहेत, असा आरोपही भाजप नेत्यांकडून केला जात होता. मात्र, अरविंद केजरीवाल यांना मनाचा मोठेपणा दाखवत, आपल्या पक्षातील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी (Atishi) यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या सभागृहात ठेवला आहे. मंत्री आतिशी ह्याच दिल्लीच्या मुख्यमंत्री (Chief Minister) होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, शीला दीक्षित यांच्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करतील, असा दावा भाजप प्रवक्त्यांनी केला होता, पण त्यांचा हा दावा फोल ठरला.
काँग्रेसच्या तत्कालीन नेत्या शिला दीक्षित ह्या 10 वर्षांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत्या. अण्णा आंदोलनानंतर दिल्लीत मोठा राजकीय बदल झाला, आणि दिल्लीचे सुत्रे नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाच्याहाती गेली. त्यानंतर, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. मात्र, गतवर्षभरात मद्य धोरण घोटाळ्यात त्यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर, जामीनावर बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, आता दिल्ली मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असलेल्या आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तसा प्रस्तावही सादर केला आहे. त्यानुसार, 26 आणि 27 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन होणार आहे. 2 दिवसांच्या या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती आहे.
केजरीवाल जामीनावर बाहेर
केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. यावरुन सीबीआयने त्यांना अटक केली होती. यानंतर केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मिळण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. अखेर आज यकेजरीवालांना जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांनी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.