राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या (MNS) कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यावरुन मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत, हे दिसून येते. माझ्यावर मनसेच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरुन विचारपूस केली. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला फोन करावासा वाटला नाही. माझा जीव गेल्यावर ते शांत होणार आहेत का, असा सवाल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी मनसेचे स्थानिक पदाधिकारी कर्णबाळा दुनबाळे आणि अकोला पोलिसांवर (Akola Polie) टीकेची तोफ डागली. राज ठाकरेंच्या पक्षासारखे खुनशी लोक महाराष्ट्रात सत्तेवर बसवले तर काही खरं नाही. कर्णबाळा दुनबाळे हा पोलिसांचा लाडका भाऊ आहे का? त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरून उठणार नाही. पोलिसांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून माझ्या डोक्यात सहाच्या सहा गोळ्या घालाव्यात. गुंडांकडून मरण्यापेक्षा पोलिसांच्या हातून मेलेलं केव्हाही चांगलं आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
अकोला पोलिसांनी कर्णबाळा दुनबाळेच्या एव्हाना मुसक्या आवळल्या होत्या. त्याला अद्याप अटक का करण्यात आली नाही. तो राजरोसपणे मुंबईत जाऊन पत्रकारपरिषद घेतो आणि पोलीस त्याच्या केसालाही धक्का लावत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांेना माझं सांगणं आहे की, तुमचे आणि राज ठाकरे यांचे कितीही चांगले कौटुंबिक संबंध असतील तरी तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात. विधिमंडळाच्या एका सदस्यावर हल्ला होण्याची बाब तुम्ही कशी सहन करु शकता, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.
मिटकरीसारख्या फालतू माणसावर मला काही बोलायचे नाही: कर्णबाळा दुनबाळे
कर्णबाळा दुनबाळे यांनी गुरुवारी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दुनबाळे यांनी पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांच्यावर टीकेची तोफ डागली. अमोल मिटकरीसारख्या फालतू माणसाबद्दल काय बोलणार? अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला झाला तेव्हाची व्हीडिओ क्लीप पाहा, मी कुठेच नाही. अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ला क्रियेला प्रतिक्रिया होती, असे दुनबाळे यांनी म्हटले.