‘अजून 12 गाड्या’ खाद्य घेऊन येणार? न्यायालयाच्या आदेशानंतरही कबूतरखान्याजवळील वाद पेटणार का?

0
73

माणदेश एक्सप्रेस न्यूज :- मुंबईतील कबूतरखान्यांवरील बंदीच्या आदेशानंतरही काही ठिकाणी कबूतरांना खाणं देण्याचे प्रकार सुरुच आहेत. दादरच्या प्रसिद्ध कबूतरखान्याजवळील असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्हिडीओमध्ये, भगव्या रंगाचा कुर्ता घातलेला आणि मूळचा लालबागमधील रहिवासी असलेला एक इसम आपल्या गाडीच्या टपावर ट्रेमध्ये खाद्य ठेवून कबूतरांना खाणं देताना दिसतो.

स्थानिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कबूतरांना खाणं देऊ नका असा सल्ला दिला असतानाही त्या व्यक्तीने हट्ट सोडला नाही. उलट, “आमच्या अजून 12 गाड्या (कबूतरांसाठी खाद्य घेऊन) येणार आहेत” असा वादग्रस्त दावा करत त्याने मुजोरी दाखवली. स्थानिकांशी त्याने हुज्जतही घातली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत असून, यामुळे वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत.

न्यायालयाचा स्पष्ट आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखान्यांमुळे होणारे श्वसनाचे आजार, विष्ठा व पिसांचा त्रास यांचा दाखला देत शहरातील सर्व कबूतरखाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेने दादरसह अनेक कबूतरखाने बंद केले. मात्र, बंदीनंतरही जैन समाजाकडून या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे.

आंदोलनाचा इतिहास

गेल्या आठवड्यात जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी दादर कबूतरखान्यातील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलक आत घुसून कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते. या पार्श्वभूमीवर 4 ऑगस्ट रोजी मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये, “कबूतरखाने बंद करणे ही आरोग्याची नव्हे तर मुंबईतील जागा आणि चौक हडपण्याची योजना आहे” असा गंभीर आरोप करण्यात आला.

निर्णय कायम, वाद कायम

जैन समाजाने उच्च न्यायालयाचा दरवाजा पुन्हा ठोठावला, मात्र न्यायालयाने आपला जुना आदेश कायम ठेवत कबूतरखाने बंदच ठेवण्याचे स्पष्ट केले. तरीही, काही व्यक्तींचा न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता कबूतरांना खाद्य देण्याचा हट्ट स्थानिकांमध्ये नाराजी निर्माण करत आहे. ‘अजून 12 गाड्या’ अशा वक्तव्यामुळे हा वाद आणखी भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here