
माणदेश एक्सप्रेस न्यूज | विशेष रिपोर्ट
रस्त्यावरून जाताना शांत बसलेले कुत्रे अचानक तुमच्या दुचाकी किंवा कारच्या मागे भुंकत-पळत सुटले आहेत, असं तुम्हाला नक्कीच अनेक वेळा अनुभवायला मिळालं असेल. ही गोष्ट जरी सर्वसामान्य वाटत असली, तरी यामागे अनेक मानसशास्त्रीय आणि प्राणीविज्ञानाशी संबंधित कारणं लपलेली आहेत. आज आपण याच विषयाचा सविस्तर उहापोह करणार आहोत.
कुत्रे गाड्यांच्या मागे का लागतात?
1. वास ओळखण्याची विलक्षण क्षमता
कुत्र्यांची घ्राणेंद्रियक्षमता माणसांच्या तुलनेत हजारोंच्या पटीनं जास्त असते. एखाद्या गाडीवर दुसऱ्या भागातील कुत्र्यांचा वास लागलेला असतो आणि जेव्हा ती गाडी त्यांच्या परिसरात प्रवेश करते, तेव्हा स्थानिक कुत्र्यांना ते ‘अनोळखी’ वाटतं. त्यामुळे ते आपल्या हद्दीचे संरक्षण करण्यासाठी गाडीचा पाठलाग करतात.
2. आपल्या हद्दीवर अधिकार प्रस्थापित करणं
कुत्रे टायरवर लघवी करून त्या ठिकाणी आपली हजेरी नोंदवतात. जेव्हा दुसऱ्या ठिकाणाहून आलेली गाडी या वासाने भरलेली असते, तेव्हा स्थानिक कुत्र्यांना वाटते की इथं दुसऱ्या कुत्र्याचा प्रभाव पसरतोय. हे ‘प्रादेशिक’ संकट समजून ते गाडीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात.
3. वैयक्तिक राग आणि अनुभव
जर एखाद्या गाडीमुळे पूर्वी एखादा कुत्रा जखमी झाला असेल, तर ते कुत्रे ती गाडी किंवा त्याचसारखी गाडी ओळखू शकतात आणि राग, सूडभावना अशा नैसर्गिक भावना व्यक्त करतात. अशा वेळी ते गाडीच्या मागे धावतात.
4. हालचाल म्हणजे शिकार
प्राण्यांमध्ये हालचाल करणाऱ्या वस्तूकडे आकर्षित होण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. स्थिर वस्तूंपेक्षा वेगात जाणाऱ्या वस्तूंना ते शिकार समजतात आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात. गाडीचा आवाज आणि वेग त्यांना सतर्क करतो.
काय करावं अशा वेळी?
गाडीचा वेग अचानक वाढवू नका. यामुळे अपघात होऊ शकतो.
शक्य असल्यास गाडी थोडी हळू करा आणि थांबा.
कुत्र्यांना त्रास देणारे आवाज, हॉर्न, किक देणे टाळा.
दररोज एका रस्त्याने जात असाल, तर तिथल्या कुत्र्यांशी सौहार्द निर्माण करा.