मुख्यमंत्री का नाही झालात पुन्हा? – संजय राऊतांचा शिंदेंवर जोरदार हल्लाबोल

0
144

माणदेश एक्सप्रेस न्यूज, मुंबई

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मंत्री योगेश कदम यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे सरकारवर भ्रष्टाचार, अनैतिकता आणि सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोप करत थेट “तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री का केले नाही?” असा सवाल केला आहे.

 

 

शिवसेना नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. सावली रेस्टॉरंटवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून हा वाद उफाळून आला असून, ते ठिकाण डान्सबार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी “योगेश कदम यांना चिंता करण्याची गरज नाही, संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे,” असे जाहीर विधान केल्यानंतर, संजय राऊतांनी या समर्थनावर जोरदार टीका केली.

 

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले,

“चार मंत्र्यांना जावं लागणार आहे, यात योगेश कदम, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट हे नावं आहेत. हे उद्या कळेलच. अमित शहांनी ताकद दिली नसती तर एकनाथ शिंदेंचं काय झालं असतं?”

 

 

ते पुढे म्हणाले, “प्रत्येक अनैतिक गोष्टीमागे एकनाथ शिंदे यांचा हात असतो. अनैतिक कृत्यांना सरंक्षण दिल्यामुळेच ते इतके आमदार आपल्याकडे खेचू शकले. त्यांचा पक्ष हा चोर, दरोडेखोरांचा पक्ष आहे. यात नैतिकता, संस्कृती, संस्कार काहीही नाहीत.”

 

 

एकनाथ शिंदेंना थेट सवाल करत राऊत म्हणाले,

“जर एवढीच ताकद आणि योग्यता तुमच्यात होती, तर तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री का केले नाही? अमित शहा ठरवतात की तुम्ही? तुमचा बाप दिल्लीला बसलाय – अमित शहा! तुम्ही फक्त बाहुल्या आहात.”

 

 

शिंदे गटातील अनेक आमदार, मंत्र्यांवर हनी ट्रॅप, आर्थिक गैरव्यवहार अशा आरोपांचे संदर्भ देत राऊत म्हणाले,

 

“हे सगळे पळपुटे, अनैतिक कृत्यात अडकलेले लोक आहेत. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांना घेऊन तुम्ही पळून गेला. हीच तुमची ताकद होती का?”

 

 

राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीवरून झालेल्या चर्चांबाबतही राऊतांनी स्पष्टीकरण दिलं.

“राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या, मी स्वतः तिथे होतो. दोघांमधील नातं घट्ट करणारा तो क्षण होता. त्यात राजकारण आणू नये,” असे सांगत त्यांनी मीडिया चर्चांना लगाम घालण्याचा प्रयत्न केला.

 

 

शिवसेना पक्ष कोणी ‘चोरून’ नेऊ शकत नाही हे स्पष्ट करत राऊत म्हणाले,

“शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची होती आणि आज उद्धव ठाकरेंची आहे. जे काही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हातात आहे तो सगळा चोरीचा माल आहे. सुप्रीम कोर्टात निकाल लागल्यावर हा माल जप्त होईल.”

 

 

शेवटी पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणून मोठेपण येत नाही, असा टोमणाही त्यांनी लगावला.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here