माणदेश एक्सप्रेस/पुणे : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर अजित पवार हे व्यासपीठावर आले. त्यावेळी शरद पवार यांच्या बाजूला अजित पवार यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. हे आसन पहिल्यानंतर अजित पवारांनी संबधित अधिकार्यांना नावाची प्लेट बदलण्यास सांगितली आणि शरद पवार यांच्या बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची प्लेट ठेवण्यास सांगितली. या कृतीमधून अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बाजूला बसण्याचे टाळल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येत आहेत. मात्र, दोन्ही नेते एकमेकांशी बोलणं अथवा एकमेकांच्या शेजारी बसणं टाळत आहेत. आजच्या कार्यक्रमात दोघांचीही आसनव्यवस्था शेजारी शेजारी करण्यात आली होती. परंतु, अचानक आसन व्यवस्था बदलण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, “सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवारांशी बोलायचं होतं. मी शरद पवारांशी केव्हाही बोलू शकतो, म्हणून बाबासाहेबांना मधे बसवलं. मी तिथे असलो तरीही मला बोलता येत होतंच. माझा आवाज एवढा आहे की दोन खुर्च्या सोडून तिसऱ्याला माझा आवाज जाऊ शकतो. बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले, त्यामुळे त्यांना मी तो आदर दिला.”