उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर मंचावर का मागितली माफी?वाचा सविस्तर

0
517

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या 35 फुट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आहे. या पुतळ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण तरीदेखील अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आणि देशासाठी मोठं योगदान आहे. शिवरायांचा इतिहास आजही प्रत्येकाला दिशा देतो. शिवराय देशाचे आराध्य दैवत आहेत. पण या दैवताचा पुर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेवरुन राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांकडून वेगवेगळे वक्तव्ये केली जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचं केंद्रातील नेतृत्वदेखील नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आता या घटनेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर मंचावर माफी मागितली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी मी माफी मागतो”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. “शिवराय आपले दैवत आहेत. शिवरायांचा पुतळा पडणं हे आपल्या सर्वांना धक्का देणारं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “कुणी केलं, काय केलं, त्याचा तपास लावला पाहिजे. त्या संदर्भात मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी याबद्दल महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो”, असं अजित पवार म्हणाले.

“युगपरुष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्या दैवतांचा पुतळा वर्षाच्या आत नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सर्वांना धक्का देणारं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “या प्रकरणात जे कुणी दोषी असतील, मग ते कुणीही असूद्यात, वरिष्ठ अधिकारी असूद्या, खालचे अधिारी असूद्या. कंत्राटदार असूद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.