खानापूर-आटपाडी मतदार संघामध्ये ‘तुतारी’ कोण घेणार? राज्यात ‘तुतारी’ वर लढणाऱ्यांची संख्या अधिक असताना, खानापूर-आटपाडी मध्ये मात्र अल्प प्रतिसाद

0
1063

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानपूर-आटपाडी मतदार संघामध्ये सध्या राजकीय वातावरण भर पावसाळ्यात देखील चांगलेच तापले आहे. मतदार संघ सध्या शिंदे गटाचे कै. अनिलभाऊ बाबर यांच्या ताब्यात आहे. परंतु त्यांच्या निधनाने मात्र राजकारणात अनेक बदल होत गेले आहेत. या मतदार संघामध्ये पक्षापेक्षा व्य्क्तीकेंद्रित राजकारण असल्याने या ठिकाणी शेवटच्या क्षणी राजकीय पक्षाच्या चिन्हाला महत्व येते. सध्या आमदारकीसाठी शिंदेगटाकडून कै. आम. अनिलभाऊ बाबर यांचे पुत्र सुहास बाबर, भाजपकडून आम. गोपीचंद पडळकर यांचे बंधू, ब्रम्हानंद पडळकर, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे प्रमुख इच्छुक आहेत. परंतु हे तिघेही महायुतीकडून प्रमुख दावेदारी सांगत असल्याने, महाआघाडीकडून विशेषतः शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मात्र सध्यातरी प्रमुख दावेदार यांच्यापैकी कोणीही इच्छुक नसल्याने, राज्यात ‘तुतारी’ वर लढणाऱ्यांची संख्या अधिक असताना, खानापूर-आटपाडी मध्ये मात्र प्रतिसाद अल्प प्रतिसाद मिळत आहे.

 

महायुतीकडून सुहास बाबर याचं नाव निश्चित असले तरी, मित्र पक्ष असलेल्या भाजपकडून आम. गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी शड्डू ठोकला असून, त्यांनी खानापूर तालुक्यासह विसापूर सर्कल मध्ये विकास कामांच्या माध्यमातून साखर पेरणी केली असून, अनेक विकास कामांच्या लोकार्पणसह लोकांच्या अडी-अडचणी समजावून घेत विअकास कामासाठी निधी देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

 

विसापूर सर्कल मध्ये पेड येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे हा निर्णय न्यायालयाने २०१३ साली दिला होता. परंतु या ठिकाणी अद्याप रुग्णालय झाले नव्हते. आम. गोपीचंद पडळकर यांच्याकडे याबाबत विसापूर सर्कल येथील नागरिकांनी भेट घेवून रुग्णालय मंजूर व्हावे असे साकडे घातले होते.

 

आम. पडळकर यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विषय लावून धरत, या ठिकाणी विशेष बाब म्हणून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. या रुग्णालयामुळे विसापूर सर्कल मध्ये प्रथमच मोठे काम होत आहे. या ठिकाणी रुग्णालय मंजूर केल्याबद्दल आम. गोपीचंद पडळकर यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी १३ सालापासून आतापर्यंत येथील लोकप्रतिनिधी यांनी विसापूर सर्कल मधील लोकांना फसवत असल्याचा आरोप देखील करत, एकवेळ आम्हाला संधी देण्याची मागणी करत, मतदार संघावर दावेदारी केली आहे.

 

कै. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देत दावेदारी भक्कम करत आहेत. महायुतीमध्ये बंडखोरी होणार हे गृहीत धरूनच त्यांनी राजकीय आखाडे बांधत, समतोल साधत आहेत.
विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र वैभव पाटील यांनी देखील कोणत्याही परिस्थिती मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाम असल्याचे सांगत, मतदार संघामध्ये दौरे सुरु केले आहेत. आटपाडी तालुक्यातून सध्या तरी त्यांच्या पाठीशी कोणताही मोठा गट नसल्याने त्यांनी कार्यकर्त्यांच्या जोरारावर आपला प्रचार सुरु केले आहे.

 

मतदार संघाचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आपली कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्याने त्यांचा पाठींबा आपल्यालाच आहे असे सर्वच इच्छुकांनी गृहीत धरला असल्याने, नेमके राजेंद्रआण्णा कुणाचे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असला, तरी राजेंद्रआण्णा यांनी निवडणूक लढविण्याचे घोषित केल्यावर मात्र, सगळ्यांच माघार घ्यावी लागणार असे सध्याचे चित्र असून, ते सध्या भाजपमध्ये असले तरी, शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे राजकीय संबंध असल्याने अगदी शेवटच्या क्षणी देखील त्यांचे नाव चर्चेत येणार हे नक्की.

 

जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील हे कै. आम. अनिलभाऊ बाबर यांचे मोठे समर्थक आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणात सुहास बाबर यांच्या पाठीशी त्यांची ताकद आहे. त्यांचे नाव चर्चेत येत असले, तरी त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसून, अनिलभाऊ यांच्या पश्चात ते सुहास बाबर यांच्या पाठीमागे ठाम आहेत. तर माजी जि.प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख भाजप बरोबर असून शेवटच्या क्षणी देखील यांचे नाव चर्चेत येत असते.

 

मतदार संघामध्ये सध्या तरी महायुतीमध्येच इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कुणाला एकाला उमेदवारी मिळणार अल्स्याने, याठिकाणी महायुतीमधील नाराजांपैकी एखाद्याला शरदचंद्र पवार यांच्या तुतारीला घेवूनच लढावे लागेल. त्यामुळे पहिल्या टप्यात तरी राज्यामध्ये ‘तुतारी’ वर लढणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी खानापूर-आटपाडी मतदार संघामध्ये मात्र ‘तुतारी’ ला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here