
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सोलापूर/अक्कलकोट
अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या शाई फेकीनंतर उडालेल्या राजकीय खळबळीला आता नव्या आरोपांनी अधिकच धार आली आहे. शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना थेट संभाजी ब्रिगेडवर आणि त्यांच्या विचारसरणीवर जोरदार हल्ला चढवला आहे.
काटे म्हणाले, “गायकवाड यांच्यावर शाईफेक हा हल्ला नव्हता, तर तो निषेध होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा अपमान चालू असून त्याच्याच निषेधार्थ आम्ही ही कृती केली. तुम्ही शाई फेकली तर ती क्रांती, आम्ही फेकली तर भ्याड हल्ला, हे कसं?”
तसेच त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या नावात ‘छत्रपती’ शब्द टाळल्याचा मुद्दा उपस्थित केला. “तुम्ही ‘छत्रपती संभाजी ब्रिगेड’ असं नाव ठेवलं असतं, तर आम्हाला काही हरकत नव्हती. पण ‘छत्रपती’ शब्द मुद्दाम टाळला गेला, यामागे हेतू आहे,” असा ठपका त्यांनी ठेवला.
काटे यांनी हेही स्पष्ट केलं की, या आंदोलनामागे कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. “भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझा संबंध आहे, पण शाईफेक आंदोलन शिवधर्म फाउंडेशनचं स्वतंत्र पाऊल होतं. माझं प्रदेश सचिवपदही २०२४ मध्येच संपलं आहे. त्यामुळे या आंदोलनाला भाजपशी जोडणं, ही संभाजी ब्रिगेडची चूक झाकण्याची चाल आहे,” असा आरोप त्यांनी केला.
यावर आणखी भर घालत काटे म्हणाले, “संभाजी ब्रिगेड पुरोगामी नाही, प्रतिगामी आहे. त्यांनी शिवधर्म स्थापन करून मूळ मराठा समाजापासून फटका घेतला आहे. ते आता मराठे राहिलेच कुठं?”
या नव्या वक्तव्यांमुळे संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या आरोपांवर संभाजी ब्रिगेडची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.