
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेली आहे. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. परंतु, याची पूर्तता कधी होईल, याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. २१०० रुपये नेमके कधीपासून मिळणार, असा सवाल केला जात आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली.
नमो शेतकरी व लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ सव्वाआठ लाख महिलांनी घेतल्याची माहिती व तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासात उघड झाली आहे. या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक १८ हजार रुपयांऐवजी सहा हजार रुपयेच मिळण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे १२ हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की, या महिलांना शासकीय योजनांतून वर्षाकाठी १८ हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही. माहिती व तंत्रज्ञान विभागाने या दोन्ही योजनांचा लाभ एकाचवेळी घेतलेल्या महिलांची नावे महिला व बालकल्याण विभागाला कळविली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. यातच अजित पवार यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधीपासून देण्यात येणार, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्थसंकल्पातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना २१०० रुपयांची मदत कधी करणार, अशी विचारणा सदस्यांनी केली होती. त्यावर सध्या लाडक्या बहिणींना १५०० रुपयांची मदत देत आहोत. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरच वाढीव मदत दिली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.