पुणे तिथे काय उणे?… महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून चक्क झुंबर, टीव्ही, एसी गायब!

0
58

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे

पुण्यातील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून झुंबर, एलईडी टीव्ही, एसी, पितळी दिवे, चित्रफिती आणि शोभेच्या इतर महागड्या वस्तू गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या बंगल्यात २४ तास CCTV कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांची सतत वर्दळ असूनही ही चोरी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

झुंबर, एसी, टीव्ही… काय काय गायब झालं?

मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेजवळील आयुक्तांचा अधिकृत बंगला हा महापालिकेने बांधलेला आहे. या बंगल्यात काही काळ महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले वास्तव्यास होते. त्यांनी जून महिन्याच्या अखेरीस बंगल्याचा ताबा सोडला. त्यानंतर महापालिकेच्या इमारत, विद्युत व सुरक्षा विभागाने बंगल्याची पाहणी केली असता अनेक महत्त्वाच्या वस्तूंचा पत्ता लागत नसल्याचे उघड झाले.

 

गायब झालेल्या वस्तूंमध्ये

१)४ एसी
२)२ मोठे एलईडी टीव्ही
३)झुंबर
४)ऐतिहासिक चित्रफिती
५)पितळी व कांस्यधातूचे दिवे
६)कॉफी मेकर
७)वॉकीटॉकी सेट
८)रिमोट बेल्स
९)चिमणीसह सुसज्ज किचन टॉप
१०)वॉटर प्युरिफायर

अशा महागड्या वस्तूंचा समावेश आहे. या सगळ्या वस्तू बंगल्यातून गायब कशा झाल्या, हे अद्याप गूढच आहे.

 

सुरक्षा असूनही चोरी कशी?

बंगल्याच्या चौकटीभोवती CCTV, सुरक्षा रक्षक, कर्मचारी हे सगळं असूनही महत्त्वाच्या वस्तूंची चोरी होणे हे अत्यंत गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ही घटना अत्यंत गोपनीय ठेवल्याने या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चोरीमागे कोणाचा हात आहे, हेही स्पष्ट झालेलं नाही.
20 लाखांची नवी खरेदी?

 

नवीन आयुक्त नवलकिशोर राम हे लवकरच या बंगल्यात राहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे महापालिकेने गायब झालेल्या वस्तू पुन्हा खरेदी करण्यासाठी जवळपास 20 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. विद्युत विभागाने काही वस्तू तातडीने उपलब्ध करून दिल्या असून इतर साहित्य खरेदीसाठी हालचाली सुरू आहेत.

 

महापालिका गप्प – उत्तर कोण देणार?

या प्रकरणात महापालिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ना कोणत्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे, ना कुठे चौकशीचे आदेश. त्यामुळे आता नव्या आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here