पुण्यात काय चाललंय? चक्क पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला; लाथा-बुक्क्यांनी जमिनीवर पाडून बेदम मारहाण!

0
75

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे

पुण्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही का, असा प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना घडली आहे. चक्क कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवरच चार जणांच्या टोळीने हल्ला करून बेदम मारहाण केली. ही घटना 31 जुलै रोजी रात्री 9 वाजता खडकी येथील चर्च चौक परिसरात घडली.

 

पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस शिपायांवर, गाडीचा वेग आणि वळणांबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून, चक्क जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिस दलात संतापाची लाट पसरली आहे.

 

काय घडलं नेमकं?

गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे हे दोघं मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक चारचाकी वाहन अतिशय वेगात आणि धोकादायक पद्धतीने चालवताना दिसले. त्यांनी संबंधित वाहनचालकास थांबवून विचारणा केली असता, अचानक चार तरुणांनी एकत्र येऊन पोलिसांवर हल्ला चढवला.

 

या हल्लेखोरांनी पोलिसांना जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शहराच्या मध्यवर्ती भागात अशी घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.

 

चारही आरोपी ताब्यात, गंभीर गुन्हा दाखल

गोपाल कोतवाल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर खडकी पोलीस ठाण्यात त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही तासांतच चौघा आरोपींना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

 

जुनेद इक्बाल शेख (वय 27)
नफीज नौशाद शेख (वय 25)
युनूस युसुफ शेख (वय 25)
आरिफ अक्रम शेख (वय 25)

 

या चारही जणांवर सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, गंभीर मारहाणीचे कलम, तसेच कायद्याचे उल्लंघन याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

 

 

पोलिस दल संतप्त, फडणवीसांचा जुना इशारा पुन्हा ऐरणीवर

या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ल्यांचे वाढते प्रमाण चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर इशारा दिला होता की, “सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”
या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुरक्षेचा आणि समाजात कायद्याचा धाक ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here