
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | इस्लामपूर :
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन.डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी रंगतदार भाषण करत जोरदार फटकेबाजी केली.
अजितदादा फास्ट बॉलर, जयंतराव गुगली मास्टर, चंद्रकांतदादा मीडियम पेसर?
क्रिकेटच्या भाषेत नेत्यांची तुलना करताना रोहित पवार म्हणाले,
“अजितदादा यॉर्कर टाकणारे फास्ट बॉलर आहेत. त्यांच्या स्पीडची भीती बॅट्समनलाही वाटते.”
“जयंत पाटील कधी ऑफ स्पिन, कधी लेग स्पिन, तर कधी गुगली टाकतात. कधी कधी तर बॉल हातात असतो, पण बॅट्समनला वाटतं की टाकलाच.”
“चंद्रकांतदादा मीडियम पेस बॉलर आहेत, पण बॉलिंग उत्तम टाकतात. विद्यार्थ्यांचे प्रश्न त्वरित सोडवतात. त्यामुळे ते भाजपचे सोनं आहेत.”
भाजपमध्ये सोनं, पण जिल्ह्यात फिरणाऱ्या ‘बेनटेक्सचं’ काय?
यावेळी रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता जोरदार टीका केली.
“भाजपमध्ये चंद्रकांत पाटील खऱ्या अर्थाने सोनं आहेत. पण आजकाल काही बेन्टेक्सचे लोक जिल्ह्यात फिरत आहेत. खालच्या पातळीवर जाऊन मोठ्या नेत्यांवर टीका करतात. मग या बेन्टेक्स सोन्याचं काय करायचं, हे भाजपच्या सोन्यानेच ठरवलं पाहिजे.”
अजितदादांच्या स्पीडची भीती का वाटते?
रोहित पवार म्हणाले, “अजितदादांच्या स्पीडची भीती बॅट्समनला वाटते. अधिवेशनात माझं भाषण झाल्यावर त्यांनी फोन करून मला बटन वरपर्यंत लावायला सांगितलं होतं. एवढं बारकाईने ते लक्ष देतात. मात्र आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला विसरत आहेत. निधीच्या बाबतीतही त्यांनी विचार करावा.”
धनंजय मुंडेंना बंगला सोडायची आठवण का करून दिली?
धनंजय मुंडेंवरही त्यांनी निशाणा साधला. “१९८० साली सरकार पडल्यावर एन.डी. पाटील यांनी त्याच दिवशी सरकारी बंगला सोडला. आज मात्र मंत्रीपद गेल्यावर पाच महिने झाले तरी लोक बंगला सोडत नाहीत. हे पाहून वाईट वाटतं,” असा खोचक टोला त्यांनी मारला.
‘राजकारण वेगळं, पण कुटुंब एकच’ – रोहित पवारांची भूमिका
एन.डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना रोहित पवार म्हणाले, “शरद पवार आणि एन.डी. पाटील नेहमी राजकारणात भिडले, पण ती टीका सकारात्मक होती. मात्र कुटुंबीय कार्यक्रमात ते एकत्र असायचे. राजकारण वेगळं असलं तरी आम्ही एक कुटुंब आहोत.”
पडळकरांना डोळ्यासमोर ठेवूनच ‘बेन्टेक्स’ हल्ला?
इस्लामपूरच्या व्यासपीठावर रोहित पवारांनी एकीकडे अजित पवार, जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांचं कौतुक केलं; तर दुसरीकडे गोपीचंद पडळकरांना नाव न घेता ‘बेनटेक्स सोनं’ म्हणत जोरदार चिमटे काढले.