सरकार मेंढपाळांच्या जीवनमान उंचावण्यासाठी कोणती पावले उचलणार?;मेंढपाळांचा विकास ट्रॅक्टर व सौरऊर्जा शिवाय शक्य आहे का?

0
204

माणदेश एक्सप्रेस न्यूज

आटपाडी/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मेंढपाळ बांधवांच्या समस्यांकडे लक्ष वेधताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मायणी जवळ रस्त्याच्या कडेला फिरत्या मेंढपाळांचे हाल पाहून त्यांची परिस्थिती समजून घेतली. शतकानुशतके परंपरागत मेंढपाळ व्यवसायासाठी रानोमाळ भटकंती करत असलेल्या या बांधवांच्या त्रासाला त्यांनी गंभीरता दिली असून, त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आणि व्यवसायात आधुनिकरण घडवून आणण्यासाठी शासनाकडे स्वतंत्र धोरण राबविण्याची मागणी केली आहे.

आमदार पडळकर म्हणाले, “महाराष्ट्रातील धनगर समाज शतकानुशतके मेंढपालनाचा व्यवसाय करत आहे. ही भटकंती त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असली तरी त्यातून होणाऱ्या असुविधा आणि हालअपेष्टांना दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. या मेंढपाळ बांधवांचे जीवन सुसह्य व्हावे आणि व्यवसायात आधुनिकता यावी, यासाठी मी सातत्याने शासनाकडे स्वतंत्र धोरण करण्याची मागणी करत आहे.”

पडळकर यांनी यावेळी शासकीय धोरणात सुधारणा करत प्रथम टप्प्यात मेंढपाळ बांधवांना ५० एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर ७५ टक्के अनुदानावर देण्याची विनंती केली. तसेच, या ट्रॅक्टरवर सौरऊर्जा पॅनल बसवण्याची व्यवस्था करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. यामुळे रात्रीच्या वेळी वाड्यावर अंधार न राहता प्रकाश मिळेल, जे मेंढपाळ बांधवांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

पडळकर यांनी महायुती सरकारच्या संवेदनशील व जनहितैषी धोरणांचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, मेंढपाळ बांधवांच्या जीवनमानात खरा बदल घडवून आणण्यासाठी आणि तांत्रिक प्रगतीसाठी प्रभावी व स्वतंत्र धोरण राबवावे. तसेच पशुसंवर्धनमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून देखील या क्षेत्रासाठी दूरदृष्टीने धोरणे अमलात आणण्याची अपेक्षा व्यक्त केली.

या मागण्या मान्य झाल्यास धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांच्या व्यवसायात नवे पंख फडकतील आणि त्यांच्या जीवनात आर्थिक तसेच सामाजिक सुधारणा होण्यास मोठा हातभार लागेल. या धोरणामुळे परंपरागत व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार मिळेल आणि समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे पडळकर म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here