
माणदेश एक्सप्रेस न्यूज-पनवेल | २ ऑगस्ट २०२५
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली असून, “मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय?” असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारच्या धोरणांवर आणि कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत हल्ला चढवला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी झंझावती भाषण करत महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला आणि “लाल बावटा आणि भगवा एकत्र आले आहेत” अशी घोषणा देत स्वाभिमानी सूर आळवला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तोफ
राज ठाकरे म्हणाले, “आम्हाला जे करायचं तेच करू, पण महाराष्ट्राच्या गळ्याला नखं लागली की आम्ही अंगावर येणार!” मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हिंदीप्रेमावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, “मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात. मात्र, इथे जे रोजगारासाठी येतात त्यांना मराठी कशी शिकवायची याचा विचार त्यांना कधीच शिवत नाही.”
“आम्ही बोललो तर संकुचित?”
ठाकरे यांनी यावेळी इतर राज्यांचे उदाहरण देत भाषेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “माझ्याकडे मंत्री भुसे हिंदीच्या मुद्द्यावर बोलायला आले होते. मी विचारलं – गुजरातमध्ये हिंदी आहे का? नाही ना! देशाचा गृहमंत्री अमित शहा म्हणतो की मी गुजराती आहे, हिंदी भाषिक नाही. मग महाराष्ट्रात हिंदी लादण्याचा प्रयत्न का?”
“मोदी पंतप्रधान झाल्यावर कित्येक प्रकल्प गुजरातला गेले. मग आम्ही आमच्या भाषेसाठी बोललो तर आम्ही संकुचित कसे?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
भूमिपुत्रांच्या हक्कांचा आवाज
राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रकाश टाकत भूमिपुत्रांच्या हक्कांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य केलं. “रायगडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. व्यवहार करणारे आपलेच लोक आहेत. कुंपणच शेत खात आहे. बाहेरच्या राज्यांतून आलेले लोक उद्योगधंद्यांत स्थिरावत आहेत आणि भूमिपुत्र मात्र दूर लोटला जातोय.”
राजकारण समजून घ्या – राज ठाकरे
“यांचं राजकारण काय चाललंय हे समजून घ्या,” असे सांगत ठाकरे यांनी सरकारवर सूचक इशारा दिला. “एकदा तुमची भाषा संपली आणि जमीन गेली, तर जगाच्या पाठीवर तुमचं काहीही उरणार नाही,” असा सज्जड दम देत त्यांनी मराठी अस्मिता आणि सांस्कृतिक अस्तित्वावर गंभीर चिंता व्यक्त केली.